
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील तुंगनाथ चतुर्वेदी या व्यक्तीने केवळ 20 रुपयांसाठी न्यायालयात खटला भरला आणि रेल्वेला गुडघे टेकायला भाग पाडले. तब्बल 22 वर्षे या व्यक्तीने कायदेशीर लढाई लढून विजय मिळवला. न्यायालयाने रेल्वेच्या विरोधात निर्णय दिल्यामुळे तुंगनाथ यांच्या लढय़ाला अखेर यश मिळाले आहे. 25 डिसेंबर 1999 रोजी ते त्यांच्या सहकाऱ्यासोबत मथुरा छावनी रेल्वे स्थानकावर मुराबादचे तिकीट खरेदी करण्यासाठी गेले होते.
तेव्हा तिकिटाची किंमत 35 रुपये होती. त्यामुळे दोन प्रवाशांच्या तिकिटाचे एकूण पैसे 70 रुपये झाले. मग तुंगनाथ यांनी तिकीट पेंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्याला 100 रुपयांची नोट दिली, मात्र त्या कर्मचाऱ्याने 70 ऐवजी 90 रुपये कापले. संतापलेल्या तुंगनाथ यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारला असता, त्याने 20 रुपये परत करण्यास नकार दिला. दरम्यान, तुंगनाथ यांनी प्रवास झाल्यानंतर कालांतराने मथुरा छावनी रेल्वे स्थानकाचे मास्टर, तिकीट बुकिंग क्लर्क यांच्याविरोधात जिल्हा ग्राहक कोर्टात खटला भरला आणि सरकारला पक्षकार बनवले.
120 वेळा सुनावणी
आतापर्यंत या प्रकरणी 120 वेळा सुनावणी झाली. अखेर तब्बल 22 वर्षांनी न्यायालयाने रेल्वेविरोधात निकाल दिला. ग्राहक न्यायालयाने रेल्वेला 20 रुपये दरवर्षी 12 टक्के व्याजाने एक महिन्याच्या आत तुंगनाथ यांना पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय कायदेशीर खर्च आणि मानसिक छळ यासाठी अतिरिक्त 15 हजार रुपये देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.