‘सामना’चा दणका! दादरचे हनुमान मंदिर पाडण्यास रेल्वेची स्थगिती, आदित्य ठाकरे यांच्या महाआरतीपूर्वीच मध्य रेल्वेचे ‘घालीन लोटांगण’

दादर रेल्वे स्टेशनबाहेरील 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून ते जमीनदोस्त करण्याचे कारस्थान रचणाऱ्या रेल्वे खात्याला दै. ‘सामना’ने जबरदस्त दणका दिला. केंद्र सरकारच्या तुघलकी कारभाराचा पर्दाफाश दै. ‘सामना’ने करताच संतप्त भाविकांनी जनआंदोलनाचा इशारा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत भाजपच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडला. तर शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज त्या मंदिरात महाआरती करण्याची घोषणा केली. त्यानंतर रेल्वे खात्याची टरकली. आदित्य ठाकरे हनुमानाची महाआरती करण्यास जाण्यापूर्वीच या कारवाईला स्थगिती देत असल्याचे पत्रकच मध्य रेल्वेने जाहीर केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हजारो भाविक आणि शिवसैनिकांनी हनुमान मंदिरात दणदणीत महाआरती केली. यावेळी ‘बजरंग बली की जय’ अशा गगनभेदी घोषणांनी शिवसैनिक आणि भाविकांनी दादर दणाणून सोडले.

दादर पूर्व येथे मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म 12 जवळ 80 वर्षांपूर्वी हमालांनी एकत्र येऊन हनुमान मंदिराची स्थापना केली होती. या मंदिराचे बांधकाम बेकायदा ठरवून त्यावर भाजप सरकारने बुलडोझर फिरवण्याची तयारी केली. हे बांधकाम 7 दिवसांत हटवावे अन्यथा कारवाई करून बांधकामाचा खर्चही वसूल करू अशी मुजोर नोटीस मध्य रेल्वेने मंदिरांच्या विश्वस्तांना बजावली. मध्य रेल्वेच्या या मुजोरीचा दै. ‘सामना’ने पर्दाफाश केला. ‘सामना’ने याबाबतचे वृत्त शुक्रवार 13 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करताच मुंबईकर भाविकांमध्ये प्रचंड संताप उसळला. संतप्त भाविकांनी बुलडोझर अंगावर घेऊ, पण हनुमान मंदिराला हात लावू देणार नाही, असे ठणकावत जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता.

सहाय्यक मंडल इंजिनीअरच्या स्वाक्षरीचे पत्रक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘सामना’ची प्रत झळकवत हिंदुत्वाचे ढिंढोरे पिटणाऱ्या भाजपला खडे बोल सुनावले. दादरचे 80 वर्षीय हनुमान मंदिर तोडण्याचा फतवा रेल्वे खात्याने काढूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. आदित्य ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता या हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेऊन महाआरती करण्याचा इशारा रेल्वे खात्याला दिला. त्यानंतर वातावरण अधिकच तापले.

दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मीडियाचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र शिवसेनेच्या या आंदोलनाने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची टरकली आणि आदित्य ठाकरे महाआरतीसाठी मंदिरात जाण्याआधीच रेल्वेने मंदिर पाडण्याबाबतच्या आपल्या नोटिसीला स्थगिती दिली. मध्य रेल्वेचे भायखळ्याचे सहाय्यक मंडल इंजिनीअर यांच्या स्वाक्षरीने हनुमान मंदिराच्या विश्वस्तांना तातडीने पत्रक पाठविण्यात आले. या पत्रकात हनुमान मंदिर पाडकामाच्या कारवाईला स्थगिती देत आहोत, असे नमूद करण्यात आले आहे.

दादरमध्ये घुमला ‘बजरंग बली की जय’चा नारा!

दादरच्या श्री हनुमान मंदिरात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हजारो भाविकांच्या साथीने मारुतीरायाची मनोभावे महाआरती केली. यावेळी भाविकांनी ‘बजरंग बली की जय’चा गगनभेदी गजर करताच अवघा दादर परिसर दुमदुमून गेला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहीर, आमदार अजय चौधरी, आमदार महेश सावंत, प्रकाश फातर्पेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीस उपस्थित होते.

मंदिरांना खरा धोका भाजपपासून!

भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित असल्यानेच मतदारांचा वापर ते ‘यूज अँड थ्रो’ असा करतात. ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आल्यानंतर त्यांनी मंदिरांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली. मंदिरांना खरा धोका भाजपपासूनच आहे, असे फटकारे आदित्य ठाकरे यांनी लगावले.