रेल्वे तिकीट बुकिंग बोंबलले

चालू महिन्यात दुसर्‍यांदा इंडियन रेल्वे केटिंरग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची अर्थात आयआरसीटीची वेबसाईट आणि मोबाइल अ‍ॅप ठप्प झाल्याने रेल्वे तिकिट बुकिंग करणार्‍यांची धांदल उडाली. देखभाल कार्यामुळे सध्या ई-तिकिट सेवा उपलब्ध नाही, असे रेल्वेने गुरुवारी सांगितले. तसेच तिकीट रद्द करण्यासाठी वा टीडीआर फाइल करण्यासाठी कस्टमर केअर नंबरवर कॉल करा अथवा मेल करण्याचे आवाहन रेल्वेने केले. मात्र, या समस्येमुळे पुन्हा एकदा प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.

विशेष म्हणजे तत्काळ तिकिट बुकिंगच्या वेळीच सेवा ठप्प झाल्याने ऐनवेळी प्रवाशांना मोठया समस्येचा सामना करावा लागला. तत्काळ तिकिट बुकिंगची वेळ सकाळी 10 वाजता असते. स्लीपर क्लाससाठी ही वेळ 11 वाजता आहे. नेमकी या वेळेतच आयआरसीटीची सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना नाना अडचणींचा सामना करावा लागला. याच महिन्यात 9 डिसेंबर 2024 रोजीदेखील सेवा पूर्णपणे ठप्प झाली.