
बैठे काम, दैनंदिन प्रवास आणि कामाचा तणाव यामुळे पोलिसांना जीवनशैलीशी निगडित आजारांना सामोरे जावे लागते. पोलिसांनी फिट आणि निरोगी राहावे यासाठी रेल्वे लोहमार्ग पोलीस आयुक्तालयात ओपन जिम सुरू करण्यात आली आहे. आयुक्तालयात काम करणारे पोलीस आणि इतर कर्मचारी यांना ओपन जिमचा फायदा होणार आहे.
मुंबईकराची लाइफ लाइन असलेल्या रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांकडे आहे. तिन्ही मार्गांवर एकूण 17 पोलीस ठाणी आहेत. रेल्वे लोहमार्ग पोलिसांचे वाडीबंदर येथे आयुक्तालय आहे. या आयुक्तालयात पोलीस अधिकारी आणि मंत्रालय आस्थापनांचे कर्मचारी काम करत असतात. अधिकारी आणि कर्मचाऱयांची कामे बसून असतात. कित्येक पोलीस आणि इतर कर्मचारी हेदेखील बोरिवली, वसई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण आदी परिसरातून लोकलने येत असतात. कार्यालयात बसून काम असल्याने त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्याची दखल घेऊन रेल्वे लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पोलीस आयुक्तालय कार्यालयात ओपन जिम सुरू केली.
या ओपन जिमसाठी लागणारे साहित्य रोटरी क्लबने पुरवले आहे. जिमसाठी कर्मचाऱयांना वेळा दिल्या जाणार आहेत. कर्मचाऱयांना दैनंदिन कामकाजातून 10-25 मिनिटे या जिममध्ये विभागप्रमुखाची परवानगी घेऊन जिमला जाता येणार आहे. आयुक्तालयानंतर लवकरच घाटकोपर येथील पोलीस मुख्यालयातदेखील ही ओपन जिम लवकरच सुरू केली जाणार आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कक्ष
लोहमार्ग पोलीस ठाण्यात आता महिलांसाठी वेगळा विशेष कक्ष सुरू केला जाणार आहे. सध्या असलेल्या पोलीस ठाण्यात जागेची अडचण पाहता एखाद्या प्रकरणात महिलेची चौकशी करायची असल्यास अडचण येतात. मात्र महिला कक्षामुळे चौकशी करणे सोपे जाईल. तसेच महिला पोलिसांनादेखील प्रायव्हसी मिळणार आहे.
पोलीस ठाण्याचे आधुनिकीकरण
रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात असलेले पोलीस ठाणे नवीन ठिकाणी दोन मजली असणार आहे. परळ, घाटकोपर, मुंब्रा, बदलापूर, कुर्ला, टिळकनगर, विद्याविहार, चर्चगेट येथे कोठा केबिन केली जाणार आहे. त्यासाठी 12 लाख रुपयांचा निधी रेल्वे पोलिसांना मिळाला आहे. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वे पोलिसांसाठी पंटेनर केबिनदेखील सुरू केली जाणार आहे.