![Police](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Police-696x447.jpg)
वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरात ट्रेनमध्ये महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर रेल्वे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. रेल्वे स्थानकांत दिवसरात्र वावर असलेल्या हमालांवर पोलिसांनी करडी नजर रोखली आहे. महिला सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेताना गर्दुल्ले, कचरा आणि बाटल्या वेचणारे, बेघर लोक तसेच शेवटची गाडी चुकल्याने रेल्वे स्थानकात झोपणाऱ्या प्रवाशांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात आहे.
वांद्रे टर्मिनसवरील घटनेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या घटनेने रेल्वे स्थानकांतील हमाल पोलिसांच्या रडारवर आले आहेत. हमालांना रेल्वे प्रशासनाकडून बॅच दिले जातात. मात्र त्यांच्या लाल रंगाच्या पेहरावाचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक फायदा उठवू शकतात. ते प्रवाशांशी जवळीक साधून महिलांच्या सुरक्षेला धक्का देणारे प्रकार करू शकतात. ही भीती लक्षात घेऊन सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस अशा प्रमुख रेल्वे स्थानकांतील हमालांच्या हालचालींवर बारीक ‘वॉच’ ठेवला जात आहे. तसेच स्थानक परिसरातील सफाई कामगार, पार्सलची ने-आण करणारे कर्मचारी, मद्यपी आदींवर विशेष पाळत ठेवण्याच्या सूचना रेल्वे पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.
सीएसएमटी स्थानकात सुरक्षेचे मोठे आव्हान
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. येथे एकूण 18 प्लॅटफॉर्म असून दिवसभरात तब्बल 44 लाख लोकांची वर्दळ सुरू असते. टर्मिनसच्या कानाकोपऱ्यात लक्ष ठेवून महिला सुरक्षा सांभाळण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांच्या जवळपास 260 कर्मचाऱ्यांमार्फत पेलले जात आहे. रात्रीच्या सुमारास टर्मिनसच्या बाहेरील आवारातही काही महिला झोपलेल्या असतात. सुरक्षेच्या दृष्टीने रोज किमान 20 ते 25 महिलांना तेथून पोलिसांच्या देखरेखीखाली आणले जाते, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.