‘रेल्वेनं चूक केली’; वंदे भारत निर्मात्याची टीका, ट्रेनमध्ये नॉन-एसी डबे वाढवण्याची केली मागणी

Sudhanshu Mani, a former railway officer

 

‘वंदे भारत’ मागील ब्रेन मानले जाणारे माजी रेल्वे अधिकारी सुधांशू मणी यांनी म्हटलं आहे की केंद्र सरकारने सामान्य लोकांच्या प्रवासाच्या गरजांवर लक्ष केंद्रित न करण्याची चूक केली आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत सरकारचं लक्ष ‘वंदे भारत’वर राहिलं आहे, परंतु एसी प्रवास परवडत नसलेल्या लोकांच्या गरजेकडे दुर्लक्ष झालं आहे.

हिंदुस्थानी रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ऑगस्ट 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीत महाव्यवस्थापक म्हणून काम केलेले मणी म्हणाले की, उच्च श्रेणीतील प्रवाशांसाठी वंदे भारत हा एक चांगला पर्याय आहे ज्यांना आरामासाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागले तरी ते इच्छुक असतात. ते म्हणाले की, सामान्य लोकांसाठी ते केवळ सोईचे नाही तर प्रतिष्ठेचे होते. तुम्हाला त्यांच्यासाठीही व्यवस्था करणे आवश्यक आहे, कदाचित सामान्य प्रवाशांची स्थिती आता आणखी बिघडली असावी’, असं ते म्हणाले. बिझनेस टुडेमध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झालं आहे.

गेल्या काही वर्षांत, अनारक्षित प्रवासी एसी कोचमध्ये घुसण्याच्या अनेक घटना देशाच्या काही भागांतून नोंदवण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा सुधारण्याच्या आणि स्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या मोहिमेवर असलेल्या रेल्वेवर अनारक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेसे काम न केल्याचा आरोपही केला जातो.

चीफ डिझाईन अभियंता म्हणूनही काम केलेले मणी म्हणाले की, मजूर किंवा विद्यार्थी अनेकदा तिकिटांशिवाय आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करतात, परंतु परिस्थिती आता बिघडली आहे. ‘पूर्वी, काही राज्यांमध्ये, विशेषत: बिहार, ओडिशा आणि यूपीमधून स्थलांतर करताना, परीक्षेसाठी प्रवास करणारे मजूर किंवा विद्यार्थी अनेकदा तिकिटांशिवाय आरक्षित डब्यांमध्ये चढत असत. मी अनेक व्हिडीओ पाहिले आहेत आणि मला विश्वास आहे की परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत खरोखरच बिघडली आहे’.

माजी अभियंता म्हणाले की आता एसी कोच तयार करण्यावर अधिक भर दिला जात आहे, ज्यामुळे नॉन-एसी कोच कमी झाले आहेत. त्यांनी पियुष गोयल यांच्या कार्यकाळातील एका घोषणेची आठवण करून दिली ज्यामध्ये ते म्हणाले की हळूहळू सर्व गाड्या वातानुकूलित केल्या जातील. प्रत्येकाला कमी भाड्यात एसी सुविधा उपलब्ध करून देणे ही चांगली कल्पना असली तरी तसे झाले नाही असं ते म्हणाले. टीकेमुळे, सरकारने धोरण बदलले आणि एसी कोच कमी आणि नॉन-एसी जास्त केले. पण हा बदल थोड्या उशिरा झाला’, असं ते म्हणाले.

मणी म्हणाले की, रेल्वेनं अनेक गाड्यांमध्ये एसी कोच वाढवले, ज्यामुळे आरक्षित स्लीपर कोच आणि कदाचित अनारक्षित डब्यांची संख्याही कमी झाली. ‘मग ते प्रवासी कुठे जातील? त्यांना प्रवास करायचा आहे, म्हणून त्यांनी वातानुकूलित वर्गात अतिक्रमण केले. हा प्रकार वाढला आहे. यात शंका नाही’.

अधिकाऱ्यानं सांगितलं की, रेल्वेचे लक्ष वंदे भारतवरच राहिले आणि त्याचं खूप कौतुक करण्यात आलं, पण सामान्य प्रवाशांच्या गरजेकडे लक्ष वळवलं गेलं. ते म्हणाले की याचा निवडणुकीवर विशेष परिणाम झाला नाही, परंतु यामुळे एक प्रतिकूल वातावरण तयार झालं. विरोधकांनी याचा फायदा घेतला, असा दावा केला की केवळ उच्चभ्रू प्रवाशांकडे लक्ष दिलं जात आहे आणि सामान्य माणसाकडे नाही’, असंही ते म्हणाले.

‘म्हणून, टीका होणे साहजिकच आहे कारण अशी परिस्थिती खरोखरच आली आहे. सोशल मीडियावर यावर टीका करणारा भरपूर मजकूर आहे, आणि लोक मला वारंवार सांगतात की वंदे भारत बनवून काहीही साध्य झालं नाही. त्यांचा मुद्दा योग्य आहे’, असंही त्यांनी सांगितलं.

ही चूक सुधारण्यासाठी ते म्हणाले, रेल्वे एसी कोचचे उत्पादन कमी करत आहे आणि नॉन-एसी वाढवत आहे. ‘माझ्या मते, तेही चुकीचे आहे. तुम्ही आणखी एसी कोच बनवा, पण सामान्यांसाठी असलेल्या वर्गांची संख्याही पूर्ववत करा आणि वाढवा. याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजं.’