पती-पत्नीच्या भांडणामुळे मुलांचे नुकसान होतं हे आतापर्यंत पाहिलं होतं. पण विशाखापट्टनममध्ये पती-पत्नीच्या भांडणामुळे रेल्वेचं तब्बल 3 कोटींचे नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे स्टेशन मास्तरलाही आपली नोकरी गमवावी लागली.
काय आहे प्रकरण?
रेल्वे मास्तर असलेल्या पतीचे ऑनड्युटी असताना पत्नीसोबत फोनवरून भांडण झाले. बराच वेळ वादावादी झाल्यानंतर पतीने मी ड्युटीवर असून घरी आल्यावर बोलू असे पत्नीला सांगितले. यानंतर ओके बोलून दोघांनी फोन ठेवला. मात्र पतीचा ओके दुसऱ्या स्टेशन मास्तरने ऐकला.
दुसऱ्या स्टेशन मास्तरला वाटले की आपल्याला ओके म्हटले. म्हणून त्याने ट्रेनला सिग्नल दिला. त्यामुळे रेल्वे प्रतिबंधित मार्गावर गेली आणि रेल्वेला त्याचे परिणाम भोगावे लागले. यामुळे रेल्वेचे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच ट्रेनला सिग्नल देणाऱ्या स्टेशन मास्तरचीही नोकरी गेली आहे.
भांडण करणाऱ्या पती-पत्नीचा 2011 मध्ये विवाह झाला आहे. पती विशाखापट्टनम राहत असून रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहे. लग्नानंतर दोन दिवसातच पत्नीच्या प्रेमप्रकरणाविषयी आपल्याला कळल्याचे पतीचे म्हणणे आहे. याबाबत सासऱ्यांनाही सांगितले, मात्र पत्नीचे प्रेमप्रकरण सुरूच आहे. तर पत्नीने हुंड्यासाठी पती आपला छळ करत असल्याचा आरोप केला आहे. अखेर पती-पत्नीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे.