पावसाळ्यात लोकल सुरळीत धावणार; पाणी तुंबू नये म्हणून पालिका, रेल्वे अधिकारी करणार संयुक्त दौरे

मुंबईत पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टी झाली तर रेल्वेजवळ असलेले नाले तुंबून रेल्वे वाहतूक ठप्प होत असते. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेजवळ असलेल्या सर्व नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण क्षमतेने करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यातही लोकल सुरळीत धावणार आहेत. यासाठी पावसाळ्याआधी पालिका आणि रेल्वे अधिकारी रेल्वे स्थानकांवर संयुक्त दौरे काढणार आहेत.

मुंबई लोकल्स मुंबईकरांची जीवनवाहिनी असून ती थांबली तर मुंबईचे जनजीवन ठप्प होते. त्यामुळे रेल्वे रुळांवर पावसाचे पाणी साचू नये यासाठी रेल्वे प्रशासनासमवेत पालिका समन्वय साधणार आहे. यासाठी पालिकेचा पर्जन्यजलवाहिन्या विभाग आणि पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासन यांची पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक पालिका मुख्यालयात झाली. यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रेल्वेजवळच्या नाल्यातून गाळ काढण्याची कामे पूर्ण क्षमतेने करावीत असे आदेश दिले.

या नाल्यांवर पालिकेची करडी नजर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, माटुंगा कार्यशाळा, चुनाभट्टी, वडाळा रेल्वे स्थानक, मुख्याध्यापक कल्व्हर्ट, मिठी नदी (शीव-कुर्ला), ब्राह्मणवाडी नाला आणि टिळकनगर नाला, विद्याविहार रेल्वे स्थानक (फातिमा नगर), कर्वेनगर नाला (कांजुरमार्ग), हरियाली नाला आणि संतोषी माता नाला, मारवाडी नाला आणि मशीद नाला, भांडुप रेल्वे स्थानक (क्रॉम्प्टन नाला, दातार नाला, उषानगर, भांडुप प्लॅटफॉर्म क्रमांक 1 तर अंधेरी, बोरिवली या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या नाल्यांमध्ये पाणी साचू नये यासाठी त्यातील गाळ पूर्ण क्षमतेने काढण्यावर पालिकेची करडी नजर असणार आहे.