रंग डरसे… लोकलच्या महिला डब्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले, आरपीएफ व जीआरपीमध्ये समन्वय नाही; कारवाईबाबत संभ्रम

मुंबई-ठाण्यात होळीची धामधूम सुरू आहे. हा उत्सव साजरा करताना लोकल ट्रेनवर पाण्याच्या पिशव्या, रंगाचे पाणी भरलेले फुगे मारणाऱ्यांचा उपद्रव वाढला आहे. पाण्याच्या पिशव्या मारणारे तरुण विशेषतः महिला प्रवाशांच्या कोचला टार्गेट करीत आहेत. असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र आरपीएफ आणि जीआरपीमध्ये समन्वय नसल्याने कारवाईबाबत संभ्रमच आहे.

होळी सण आला की पाण्याच्या पिशव्या, रंगमिश्रित पाण्याचे फुगे लोकलवर फेकण्याचे प्रकार घडतात. हे प्रकार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे रेल्वेने दरवर्षीप्रमाणे यंदाही जाहीर केले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या अखत्यारीत येणाऱ्या लोहमार्ग पोलिसांनी त्याबाबत दक्षता घेतली आहे. आयुक्तालय कार्यालयाकडून तशा सूचना प्रत्येक पोलीस ठाण्याला दिल्या आहेत. मात्र अशा घटनांबाबत आरपीएफ अद्याप सक्रिय नसल्याची वस्तुस्थिती आहे.

वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वांद्रे, खार, सांताक्रुझ असा संवेदनशील भाग मोडतो. रेल्वे रुळालगत झोपड्या असल्याने या भागात अधिक घटना घडण्याची भीती आहे. असे असताना आरपीएफचे जवान कारवाईबाबत अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले. पाण्याच्या पिशव्या, फुगे फेकणाऱ्यांना पकडायचे कोणी? याबाबत जीआरपी व आरपीएफमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे महिला व इतर प्रवाशांना फुगे मारणाऱ्यांच्या दहशतीखाली लोकल प्रवास करावा लागत आहे.

सुरक्षित प्रवासाचा दावा पूर्णतः चुकीचा

लोकलवर फुगे फेकणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला जातो. प्रत्यक्षात कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी हे प्रकार घडताहेत. महिलांचा लोकल प्रवास सुरक्षित केल्याचा दावा सरकार करते. हा दावा पूर्णतः खोटा आहे. वस्तुस्थिती वेगळीच आहे. आम्ही कुठल्या ना कुठल्या दहशतीखाली प्रवास करतो, अशी प्रतिक्रिया मालाड येथील आदिती सावंत यांनी दिली.

अद्याप एकावरही कारवाई नाही!

रेल्वेने सोशल मीडियातून जनजागृती सुरू केली, मात्र जीआरपी वा आरपीएफने अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही. फुगे फेकणाऱ्यांना मोठ्या मुश्किलीने झोपडपट्टी वस्तीतून पकडतो. त्यांना कारवाईसाठी आरपीएफकडे सोपवावे लागते. आम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे एका पोलिसाने सांगितले.