पश्चिम रेल्वेच्या 17 एसी लोकल अचानक रद्द; ऐन उन्हाळ्यात गाड्यांच्या देखभालीचा प्रश्न, गैरसोयीने प्रवाशांना फोडला घाम

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल गाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाडय़ांमुळे पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे. असे असताना रेल्वे प्रशासनाने गुरुवारी अचानक एसी लोकलच्या 17 फेऱया रद्द केल्या. ऐन उन्हाळय़ात एसी लोकल गाडय़ांच्या देखभालीचा प्रश्न उद्भवल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. शुक्रवारीही एसी लोकलच्या संबंधित 17 फेऱया रद्द असतील, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

मुंबईत उन्हाळय़ाची तीव्रता वाढली असून प्रवासी उपनगरी रेल्वे मार्गावर प्रवास करताना एसी लोकलला प्राधान्य देत आहेत. मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वेवर एसी लोकलचे प्रमाण अधिक आहे. गुरुवारी अचानक या एसी लोकलच्या 17 फेऱया रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शुक्रवारी सलग दुसऱया दिवशी या फेऱया रद्द राहणार आहेत. संबंधित एसी लोकलच्या जागी नियमित लोकल चालवल्या जाणार आहेत. चर्चगेट ते बोरिवली आणि चर्चगेट ते विरार अशा मार्गांवर धावणाऱया एसी लोकल अचानक रद्द करण्यात आल्या. या फेऱया रद्द करण्यामागे देखभालीचे कारण असल्याचे बोलले जात आहे. मात्र यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने नेमके कारण स्पष्ट न केल्यामुळे प्रवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

रेल्वे प्रशासनाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी

उन्हाळय़ात उकाडय़ाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही अधिकचे पैसे मोजून एसी लोकल प्रवासाला प्राधान्य देतो. असे असताना रेल्वे प्रशासन आयत्यावेळी एसी लोकलच्या फेऱया रद्द करते. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना योग्य स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते, मात्र रेल्वे प्रशासनाने ही जबाबदारी झटकून आम्हाला गैरसोयीचा सामना करण्यास भाग पाडले, अशी नाराजी अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.