तेलंगणातील वारंगलमधील वारंगल-मामुनुरु मार्गावर विचित्र आणि भीषण अपघात घडला आहे. रेल्वे रुळांचे रॉड नेणारा ट्रक दोन ऑटोरिक्षांना ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. त्यानंतर ट्रकमधील रॉड रिक्षावर पडले. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. त्यात एका मुलाचाही समावेश आहे. तर अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.
रेल्वे रुळांसाठी वापरले जाणाऱ्या लोखंडी रॉडने भरलेल्या ट्रकने दोन रिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात लोखंडी रॉड रिक्षावर पडल्यामुळे सात जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात चार महिला आणि एक मुलाचा समावेश आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत.
ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. तसचे त्याने दोन रिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओव्हरटेक करताना ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी रॉड रिक्षावर पडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मार्गावर पडलेले लोखंडी रॉड क्रेनच्या मदतीने हटवण्यात आले. त्यानंतर मार्गावरील वाहतूक सुरू झाली. या अपघातप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.