रेल कामगार सेना सेंट्रल रेल्वे मजदूर संघाबरोबर संयुक्तरीत्या निवडणूक लढणार! मध्य रेल्वेची मान्यताप्राप्त संघटना

मध्य रेल्वेमध्ये 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत होऊ घातलेल्या मान्यताप्राप्त संघटनेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेने सेंट्रल रेल्वे मजदूर संघ यांच्याबरोबर संयुक्तरित्या युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच रेल कामगार सेना अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या सूचनेनुसार तसेच रेल कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी आणि सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगारांचे हित लक्षात घेऊन रेल कामगार सेनेने हा निर्णय घेतला. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष प्रवीण बाजपेयी यांच्या संयुक्त बैठकीत युतीच्या दस्तऐवजांची देवाणघेवाण केली. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची निशाणी असलेल्या वडाचे झाड या निशाणीवर शिक्का मारून निवडून देण्याचे आवाहन केले. या वेळी रेल कामगार सेनेतर्फे चंद्रकांत विनरकर, सूर्यकांत आंबेकर, प्रशांत कमानकर, सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे कार्याध्यक्ष व्ही. के. सावंत, एजीएस राम खाटपे, राजन सुर्वे उपस्थित होते.

कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण
रेल कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे संयुक्तरित्या 13 तारखेला कल्याण येथे लोको शेडमध्ये प्रचाराचा नारळ फोडून संपूर्ण मध्य रेल्वेमध्ये प्रचार यंत्रणा राबवली जाणार आहे. सेंट्रल मजदूर संघ रेल कामगार सेनेच्या मदतीने निश्चित विजय प्राप्त करेल अशा प्रकारची भावना सर्व कामगारांमध्ये आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या सर्वच अधिकाऱयांनी याची नोंद घेतली असून आता शिवसेना प्रणित संघटनासुद्धा मान्यताप्राप्त संघटनेचा हिस्सा बनणार असल्याने त्यांच्यामध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. कामगार या युतीकडे एक मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.