कोकण रेल्वेच्या भरतीत प्रकल्पग्रस्तांवर अन्याय नको! रेल कामगार सेनेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे मागणी

ज्यांची जमीन कोकण रेल्वे प्रकल्पामध्ये गेली आहे अशा प्रकल्पग्रस्तांवर कोकण रेल्वेच्या भरतीत अन्याय करू नका, अशी मागणी नुकतीच रेल कामगार सेनेच्या वतीने कोकण रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष झा यांच्याकडे करण्यात आली आहे. या बैठकीत विविध विषयांवरदेखील चर्चा झाली.

शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली तसेच कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या उपस्थितीत बेलापूर येथील कोकण रेल्वे मुख्यालय येथे कोकण रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष झा यांची भेट घेण्यात आली. कोकण रेल्वेतील 190 जागांच्या भरतीसाठी 40 हजारांच्या पुढे तरुणांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये अकरा हजार अर्ज हे प्रकल्पग्रस्तांचे आहेत. अशा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय न होऊ देता त्यांची भरती कशी होईल यासाठी काही विशेष करता येईल का? याकडे बैठकीत विनायक राऊत यांनी लक्ष वेधले. त्यावर 190 पैकी 95 जागा या ग्रुप ‘डी’च्या असून त्या पूर्णपणे प्रकल्पग्रस्तांच्या कोट्यातूनच भरल्या जातील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी झा यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्त मेरिटमध्ये येत असतील तर त्यांना प्रथम संधी देण्यात येईल. त्यानंतर ज्यांच्याकडे एम्प्लॉयमेंट कार्ड आहे आणि ते मेरिटमध्ये आले आहेत त्यांचा विचार केला जाईल. या दोन्ही वरील कॅटेगरीमध्ये उमेदवार न मिळाल्यास महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील डोमेसाईल असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. पारदर्शकपणे या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पॉइंट्समन लोकांना 2400 आणि 2800 या ग्रेड पेबद्दल आग्रही भूमिका घेण्यात आली. तसेच एस ऍण्ड टी डिपार्टमेंटसाठी रिस्ट्रक्चरिंग रेल्वे बोर्डाच्या नवीन नियमानुसार करावे, टीटीई रूम तसेच सर्व लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर लॉबीमध्ये एअर कंडिशन लावावे असे सुचवले. या बैठकीला स्वप्नील जेम्स, भारत शर्मा, कोकण रेल्वेचे राजू सुरती नागराज, लोबो, दत्ता तेलंगे, गजा गायकर, शमी दादरकर उपस्थित होते.

2027 मध्येसुद्धा कोकण रेल्वेमध्ये 457 जागांसाठी रेल्वे बोर्डाचे अप्रूव्हल घेऊन नोटिफिकेशन काढण्यात येणार आहेत. त्यावेळेला त्या-त्या कॅटेगरीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रकल्पग्रस्तांनी मिळवावी यासाठी कोकण रेल्वेकडून तशा प्रकारची माहिती गोळा करून तातडीने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील उच्च शिक्षण संस्थांना पुरवावे. या भरतीत जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्त नोकरीला कसे लागतील यासाठी विशेष कॉम्प्युटर प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचे क्लासेस चालू करण्याचे आदेश विनायक राऊत यांनी दिले.