मोटरमनला आवश्यक सुविधा पुरवा! रेल कामगार सेनेने घेतली मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांची भेट

रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांची भेट घेतली. यावेळी रात्रंदिवस काम करणाऱ्या मोटरमनना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात तसेच मोटरमन लॉबीमध्ये गरम पाणी तसेच चहा-कॉफीसाठी इंडक्शन प्रणाली लगेच लागू करावी, अशी आग्रही मागणी रेल कामगार सेनेतर्फे करण्यात आली. मोटरमनला मानसिक त्रासातून जावे लागत असल्यामुळे याकडे तातडीने लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली.

शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱयांनी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांची सदिच्छा भेट घेतली. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या मान्यताप्राप्त निवडणुकीत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाबरोबर (सीआरएमएस) युती करून रेल कामगार सेना (आरकेएस) विजयी झाली आहे. सीआरएमएस आणि आरकेएस यांच्यामध्ये जो एमओयू झाला होता या संदर्भातील सीआरएमएसचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण बाजपेयी यांनी जनरल मॅनेजरला लिहिलेले पत्र यावेळी सुपूर्द करण्यात आले. रेल कामगार सेना मध्य रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त संघटनेचा अंगीकृत हिस्सा असून सर्वच शासकीय चर्चांमध्ये रेल कामगार सेनेचे प्रतिनिधी भाग घेतील, असेही सांगितले. त्यास जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी स्वीकृती दर्शवली. या वेळेला सातत्याने होणाऱया स्पाड याविषयीसुद्धा चर्चा झाली.

ट्रकमन यांचा 10 टक्के आणि 40 टक्के कोटा तसेच नागपूर विभागासाठी बडनेरा येथे तातडीने ऑप्लिकेशन स्वीकारा, अनुकंपा तत्त्वावर मिनिस्ट्रियल कोटा क्वालिफिकेशननुसार भरावा ही आग्रही भूमिका घेतली. यावेळी मुंबई डिव्हिजनचे तसेच हेडक्वार्टर तसेच महिला आघाडीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.