पेणच्या खारेपाट भागातील 27 वाड्यांवर भीषण पाणीटंचाई, विकतच्या पाण्यावर भागवावी लागते तहान

पेण तालुक्यातील वाशी, शिर्की खारेपाट विभागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खारेपाट विभागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आठ ग्रामपंचायत हद्दीतील 27 वाड्यांमधील महिलांना पाणी आणण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागते. बोअरवेल, विहिरी, डबक्यातील पाणी दूषित असल्याने पिण्यासाठी विकतचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.

खारेपाटातील हजारो नागरिकांच्या जिवावर उठलेला पाणीप्रश्न नागरिकांना हैराण करीत आहे. या समस्येकडे शासनदरबारी वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना गेल्या 50 वर्षांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पाणीटंचाई निवारणावर कोट्यवधी रुपये खर्चदेखील करण्यात आले, परंतु ते कागदावरच. प्रत्यक्षात मात्र येथील भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरलाच नाही. पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना ऑक्टोबरपासून जवळच असलेल्या पेण शहरातून विकतचे पाणी आणून आपली तहान भागवावी लागते. खारेपाटातील आठ ग्रामपंचायतींमधील 27 वाड्यांवर टँकरची मागणी होत आहे.

वर्षातील सहा महिने टँकरचा आधार

पेण तालुक्यातील 39 गावे व 103 वाड्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी शासन निधी मंजूर करीत असले तरी तो पुरेसा नसल्याने खारेपाटात पाणीटंचाईची समस्या जैसे थे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तालुक्यातील शिर्की, वाशी खारेपाटातील टंचाईग्रस्त गावांवर व वाड्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी शासकीय व खासगी टँकरचा आधार घेतला जातो. नोव्हेंबरपासून जूनपर्यंत टँकरच्या फेऱ्या तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर सुरू असतात.