Raigad News – श्रीवर्धनच्या समुद्रात पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने सख्ख्या भावांसह तिघे बुडाले

पोहायला गेलेल्या तीन तरुणांचा श्रीवर्धनमध्ये बुडून मृत्यू झाला. वेळास समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि लाटांसोबत समुद्रात खेचले गेल्याने तिघेही बुडाले. मयतांपैकी दोघे सख्खे भाऊ होते. मयुरेश संतोष पाटील, अवधूत संतोष पाटील आणि हिमांशु पाटील अशी मयत तरुणांची नावे आहेत. हिमांशु हा नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहत होता.

तिघे तरुण श्रीवर्धनजवळील गोंडघर गावातील रहिवासी होते. तिघेही शनिवारी सकाळी वेळास समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. तिघेही पोहण्यासाठी समुद्रात उतरले. यावेळी तिघेही लाटांसोबत समुद्रात खेचले गेले. स्थानिक नागरिकांनी तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.

नाका-तोंडात पाणी जाऊन तिघांचाही मृत्यू झाला. स्थानिक तरुण आणि वॉटर स्पोर्ट्स चालकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. तरुणांच्या मृत्यूमुळे गोंडघर गावात शोककळा पसरली आहे.