रायगड जिल्ह्यात मिंधे गटात वॉर; आमंत्रण दिले नाही म्हणून राजा केणींचा थयथयाट, तालुकाध्यक्षाला हटवले

रायगड जिल्ह्यात मिंधे गटातील वॉर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत मुरुडमध्ये मिंधे गटाची बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजा केणी यांना आवतण देण्यात आले नाही. त्यामुळे तिळपापड झालेल्या केणींनी या कार्यक्रमाच्या दोन तास आधीच पत्रक काढत थेट मुरुड तालुकाध्यक्ष ऋषिकांत डोंगरीकर यांना पदावरून हटवले. या फतव्याने डोंगरीकर समर्थकांनी संताप व्यक्त केला असून केणी यांना धडा शिकवण्याचा निर्धार केल्याची चर्चा आहे.

आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत मुरुडमध्ये सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे निमंत्रण जिल्हाध्यक्ष राजा केणी यांना देण्यात आले नव्हते. राजा केणी यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची चर्चा सुरू होती. यामुळे खवळलेल्या केणी यांनी मुरुड तालुकाध्यक्ष ऋषिकांत डोंगरीकर यांनी पक्षशिस्त पाळली नसल्याचा ठपका ठेवत त्यांच्या पदाला स्थगिती दिली आहे. यामुळे मिंधे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा केणी यांचा थयथयाट

पदाला स्थगिती देताना केणी यांनी प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाध्यक्ष म्हणून मला व महिला जिल्हाध्यक्ष, तसेच युवा जिल्हाध्यक्ष आणि महिला संपर्कप्रमुख यांना बोलावणे गरजेचे होते, पण जाणीवपूर्वक आम्हाला डावलण्यात आले आहे असा थयथयाट केणी यांनी केला आहे. प्रोटोकॉल न पाळता ही सभा आयोजित केली नसल्याने पक्षशिस्तीचा भंग झाला आहे म्हणूनच आपल्या मुरुड तालुकाध्यक्ष पदाला स्थगिती देण्यात येत असल्याचे राजा केणी यांनी स्पष्ट केले आहे.