
रायगड जिल्ह्यातील पेण आणि सुधागड तालुक्याला बुधवारी मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पेण तालुक्यातील हेटवणे धरणापासून काही अंतरावर असणाऱ्या तिलोर व महागाव परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्यानंतर काही सौम्य धक्के जाणवल्याचे स्थानिकांनी सांगितले. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर अनेक घरातील भांडी पडली, घरात लटकलेल्या अनेक वस्तू खाली पडल्या. मात्र सुदैवाने कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
भूकंपाची माहिती मिळताच बुधवारी मध्यरात्री तलाठी आणि अन्य महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. लवकरच भूगर्भ तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात येणार असल्याचे कळते. पेणचे तलाठी आणि पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांनीही घटनास्थळी भेट दिली.