Raigad News : माणगावमध्ये कुंडलिका नदीत चौघे बुडाले, दोघे सापडले; दोघांचा शोध सुरू

कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा कुंडलिका नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडली. बुडालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा अद्याप शोध सुरू आहे. सिद्धेश सोनार, काजल सोनार, सिद्धी पेडेकर आणि सोनी सोनार अशी बुडालेल्या चौघांची नावे आहेत.

सिद्धेश सोनार आणि सिद्धी पेडेकर यांचे मृतदेह सापडले असून काजल सोनार आणि सोनी सोनार यांचा शोध सुरू आहे. सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून माणगाव तालुक्यातील शिरवली गावात आजीकडे आले होते.

बुडालेल्या चौघांसह एकाच कुटुंबातील 10 ते 12 जण शनिवारी सायंकाळी साजे येथे कुंडलिका नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी एक जण पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी इतर तिघांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र चौघेही वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. दोघांचे मृतदेह सापडले असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. रात्र झाल्याने शोधमोहिम थांबवण्यात आली असून रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात येईल.