![zp school](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/zp-school-696x447.jpg)
डिजिटल स्कूल… सेमी इंग्रजी… घरोघरी जाऊन विद्यार्थी वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न… मोफत गणवेश… शालेय पोषण आहार… यांसह विविध योजना राबवूनही जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. त्यामुळे मुलांची पटसंख्या झपाट्याने घसरत असून 2024-25 या शैक्षणिक वर्षात रायगडातील तब्ब्ल 26 शाळांना कायमचे टाळे लागले आहेत. या बंद करण्यात आलेल्या शाळांमधील जवळपास अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात आले आहे.
पटसंख्येला लागलेली गळती रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, डिजिटल स्कूल, पोषण आहार, सेमी इंग्रजी शिक्षण, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, पालकांच्या घरोघरी जाऊन पाल्याला जिल्हा परिषद शाळांमध्ये टाकावे यासाठी भेटीगाठी यांसह गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र एवढे उपाय करूनही जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थी पटसंख्येत घट होत आहे. अगदी शेवटच्या घटकातील पालक ही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये पाठवू लागला असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत.
रोहे, माणगावमध्ये सर्वाधिक शाळांना फटका
जिल्ह्यातील 26 शाळा वर्षभरात पटसंख्येअभावी बंद करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यातील 2, पेण 2, कर्जत 1, रोहा 6, माणगाव 6, श्रीवर्धन 3, पोलादपूर 3, महाड 3 अशा 26 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या असून पटांगणही आहेत. सर्व सुविधांयुक्त शाळा असूनही विद्यार्थी टिकवणे शाळेतील शिक्षकांना जमलेले नाही.
विद्यार्थी संख्या आणखी घटण्याची शक्यता
जिल्हा परिषदेच्या 2 हजार 528 शाळा असून यापैकी 26 शाळा पटसंख्या अभावी बंद झाल्या आहेत. यामुळे सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या 2 हजार 502 शाळा सुरू आहेत. पटसंख्येअभावी 2025-26 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या अजून घटण्याची शक्यता असल्याने आणखी काही शाळा बंद होण्याची शक्यता आहे.