
पेण, सुधागड तालुक्याला बुधवारी मध्यरात्री भूकंपाचे धक्के बसले. या हादऱ्यांनी अनेक घरांमधील भांडीकुंडी कोसळली. त्यामुळे भीतीच्या आकांताने नागरिकांनी घराबाहेर पळ काढत अक्षरशः रात्र जागून काढली. भूकंपाच्या तडाख्यामुळे पाच घरांचे किरकोळ नुकसान झाले असून कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने याची नोंद भूकंप मापक यंत्रावर झाली नाही. असे असले तरी भूवैज्ञानिक या गावांचे सर्वेक्षण करणार आहे.
क्षेत्रालगत असलेल्या तिलोरे तर सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी, कलाकाराई, भोपेची वाडी, कवेळीवाडी येथे भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली. ही घटना बुधवारी रात्री 11.30 ते 12.30 दरम्यान घडली. या धक्क्यामुळे घरांमधील भांड्यांची पडझड झाली. धास्तावलेल्या गावकऱ्यांनी तालुका प्रशासनाला याबाबतची माहिती दिली, तर सुधागड तालुक्यातील देऊळवाडी, कलाकाराई, भोप्याची वाडी, कवेले वाडी परिसरात मध्यरात्री भूगर्भातून गूढ आवाज येत असल्याची तक्रार तेथील रहिवाशांनी केली आहे. मात्र भारतीय हवामान विभाग मुंबई (घ्रङ) तसेच सातारा कोयनानगर येथील भूमापन केंद्रावर भूकंपाची नोंद झालेली नाही. याबाबत पुणे येथील भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागामार्फत गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र तसेच संकेतस्थळावर या भूकंपाची कोणतीही नोंद न झाल्याने जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला या भूकंपग्रस्त गावात येऊन सर्व्हे करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे.
■ सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
घाबरू नका, सतर्क राहा!
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री दोन्ही गावांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. गावकऱ्यांना पुन्हा धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. मध्यरात्री सलग चार वेळा तर पहाटे दोन ते तीन वेळा भूकंपाचे धक्के बसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पेण तालुक्यातील वरवणे, सायमाळ, तिलोरे, झापडी, दिवाणमाळ, तिलोरे, भेंड्याची वाडी व सिंधळाची वाडी तसेच सुधागड तालुक्यातील भोपेची वाडी, देऊळवाडी, महागाव, कवेळीवाडी या गावांना हा तडाखा बसला आहे. भूकंपाची माहिती कळताच गुरुवारी सकाळी तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या पथकाने भूकंपग्रस्त भागातील ग्रामस्थांचे संवाद साधला व प्रत्यक्ष पाहणी केली