
जेएसडब्ल्यू कंपनीच्या हायटेन्शन लाईनचे काम बंद करणाऱ्या पाच शेतकरी महिलांना मातीत गाडण्याची खुलेआम धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार नागोठणे येथे समोर आला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या बाहेरशीव येथील गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर धडक देत कंत्राटदार चौधरी व अन्य दोन गुंडांविरोधात तक्रार दाखल केली आहे. उच्चदाब लाईनला जमीन द्यायची की नाही हा आमचा अधिकार असून जेसीबीखाली चिरडून जमिनीत गाडण्याची धमकी देणाऱ्या या ‘वाल्मिक कराड’ प्रवृत्तीला वेळीच ठेचा अशी मागणी केली आहे.
पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीसाठी वडखळ ते नागोठणे येथील विद्युत पारेषण कंपनीच्या सबस्टेशन येथून हायटेन्शन लाईन टाकण्यात येणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी मनोरे उभे करण्याचे काम सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच हे काम रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन या लाईनचे काम करत असलेला कंत्राटदार काही गावगुंडांना हाताशी धरून ठिकठिकाणा दमदाट्या करण्याचा प्रयत्न करत आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील पळस ग्रामपंचायत हद्दीतील बाहेरशीव येथे असेच काम सुरू होते. यावरून काही शेतकरी महिलांनी जाब विचारत आमच्या शेतातील काम तत्काळ बंद करा अशी मागणी केली. त्यावर कंत्राटदार चौधरी व राम घरत यांनी या महिलांना दमदाटी करत पळता की तुमच्यावर जेसीबीने माती टाकून खड्ड्यात गाडू अशी धमकी दिली.
… तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू
बाहेरशीव येथील महिला रेवती म्हात्रे, भरती म्हात्रे, धर्मी म्हात्रे, वर्षा म्हात्रे व बेबी म्हात्रे यांना कंत्राटदाराने ही धमकी दिली आहे. याबाबत आज रघुनाथ म्हात्रे तसेच अन्य ग्रामस्थांनी नागोठणे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. आम्हाला खुलेआम अशा धमक्या दिल्या जात असतील तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा या महिलांनी दिला आहे.
गुन्हा दाखल करण्यात चालढकल
गावकऱ्यांना धमकी देणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी केवळ एनसी नोंदवली आहे. त्यामुळे पोलीस जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यात चालढकल करीत असल्याचा आरोप होत आहे. उद्या आमच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास कंत्राटदाराला पाठीशी घालणारे पोलीस आणि प्रशासन जबादार राहील असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान नागोठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी याबाबत निश्चितच कारवाई करण्यात येईल असे सांगितले.