
पेण व अलिबाग तालुक्यात उग्र पाणीटंचाई निर्माण झाली असून 36 गावे आणि वाड्यांमधील 10 हजार 830 नागरिकांना 11 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करून महिलांना पाणी आणावे लागत आहे.
रायगड जिल्ह्याला सध्या तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे जिल्ह्यातील अलिबाग, पेण या दोन तालुक्यांमधील 36 गावे व वाड्यांवर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या गावे, वाड्यांना 11 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याचे दिसून येते. यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून त्यांना दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी खासगी टँकरच्या माध्यमातून विकतचे पाणी नागरिक मागवत असल्याचे चित्रही दिसून येते.