चंदगडमध्ये अवैध गौण खनिज उत्खननावर छापा; 10 डंपर जप्त

चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक येथे सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर जिल्हा खनिकर्म व चंदगड तहसील कार्यालयाने संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत 49 ब्रास गौण खनिज व 10 डंपर ताब्यात घेण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने चंदगड तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. या कारवाईमुळे शिवसेनेच्या आंदोलनाला यश मिळाले असून, अवैध खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

राजगोळी बुद्रुक येथे रविवारी पहाटे कोल्हापूर जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी आनंद पाटील, चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. या छाप्यात गौण खनिज उत्खननासाठी वापरलेले एक पोकलेन, 10 डंपर व 49 ब्रास गौण खनिज जप्त करण्यात आले आहेत. या पथकात नायब तहसीलदार हेमंत कामत, अशोक पाटील, मंडल अधिकारी शरद मगदूम, तलाठी अक्षय कोळी, प्रशांत पाटील, गणेश रहाटे, शुभम मुंडे, अरुण शिंदे, सुनील सोमशेट्टी, अरुण शिंदे, महसूल सहायक गौस मकानदार, अप्पासाहेब नाईक, दीपक आंबी यांचा समावेश होता.

शिवसेनेच्या आंदोलनाचा ‘धसका’

चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या अवैध खनिज उत्खननाविरोधात शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत अवैध खनिज उत्खननावर कारवाईची मागणी केली होती. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाचा धसका घेत जिल्हा खनिकर्म व तहसील कार्यालयाने संयुक्त कारवाई केली आहे.