नगरचे मनपा आयुक्त जावळे यांच्या घराची झाडाझडती

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे राहत असलेल्या नगरमधील शासकीय ‘स्वराज’ या निवासस्थानाची शुक्रवारी (28 रोजी) रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेतली. तसेच आज सकाळीही पुन्हा तपासणी करण्यात आली. आयुक्त जावळे व त्यांचा स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्याविरोधात बांधकाम परवान्यासाठी लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचत प्रतिबंधक पथकाने सापळा लावल्याची कुणकुण लागताच दोघे फरार झाले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या पथकाने आयुक्त पंकज जावळे यांच्या निवासस्थानाची झाडाझडती घेतली.

आयुक्त जावळे व श्रीधर देशपांडे यांनी आठ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीतून तसे उघडही झाले. ही पडताळणी 19 तारखेला करण्यात आली. त्यावेळी लाचेची रक्कम 25 जून रोजी स्वीकारण्याचे ठरले होते. तेव्हापासून लाचलुचपतचे पथक जावळे यांच्या मागावर होते. मात्र, सापळय़ाची कुणकुण लागल्याने देशपांडे 24 जूनपासून रजेवर गेले. तक्रारदार 25 जून रोजी पालिकेत गेले; परंतु दोघेही हजर नव्हते.