भरदिवसा रस्तालूट करून 20 लाख रुपये पळविले; चारचाकी वाहनाच्या काचा फोडून पाच ते सहा लुटारूंनी रोकड लुटली

चारचाकी वाहनातून सुमारे 20 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना पाठीमागून चारचाकी वाहनातून व एका दुचाकीवर आलेल्या पाच ते सहा लुटारूंनी वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण करून रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून लुटारू पसार झाले. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजता राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात घडली.

राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या माउली दूध शीतकरण केंद्रातील कर्मचारी अनिल बनसोडे व चालक असे दोघेजण सकाळी 11 वाजेदरम्यान सुमारे 20 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चारचाकी वाहनातून ब्राह्मणी येथील बँकेत भरणा करण्यासाठी जात होते. दरम्यान, ते राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावरील ब्राह्मणी शिवारातील तांबे वस्तीजवळ असताना एका काळ्या रंगाच्या विनानंबरच्या चारचाकी वाहनातून व दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा लुटारूंनी बनसोडे यांची गाडी अडवली. यावेळी लुटारूलोखंडी रॉड घेऊन खाली उतरले. रोख रक्कम असलेल्या वाहनाच्या काचा फोडून दोघांना धारदार शस्त्रे दाखवून दहशत निर्माण करून बनसोडे व चालकाला त्यांच्याकडील रोकडची बॅग हिसकावून शनिशिंगणापूरच्या दिशेने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, हवालदार रोहिदास नवगीरे, वाल्मीक पारधी, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे यांच्यासह अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला. लुटारू ज्या वाहनातून आले होते, ते वाहन माउली शितकरण केंद्र परिसरात अर्धा तास थांबले होते. त्यांनी पाळत ठेवून रोकड लुटल्याची चर्चा सुरू आहे.

भरदिवसा झालेल्या या रस्तालुटीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. रस्तालुटीच्या गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असल्याने पोलीस प्रशासन काय करतेय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुपारी उशिरापर्यंत फिर्याद दाखल न झाल्यामुळे बँकेत भरणा करण्यासाठी किती रक्कम आणली होती, हे मात्र समजू शकले नसले नाही. रस्तालुटीतील आरोपींच्या शोधासाठी राहुरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक तैनात केले आहे.