नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी खुर्द हद्दीतील हॉटेल न्यू भरत हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपींना अटक, तर 3 महिलांची सुटका केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी ही कारवाई केली. दोन आरोपींकडून 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विक्रम सुरेश विशनानी (वय – 27, रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी), फराद अहमद सय्यद (वय – 38, रा. पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे, सारिका दरेकर, रणजीत जाधव यांचे पथक तयार करून ते अवैध धंद्यांची माहिती काढण्यास रवाना केले. पथक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना राहुरी-नगर रोडवरील न्यू भरत हॉटेल येथे एक इसम महिलांकरवी कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. पोलीस पथकाने ही माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिली. त्यानंतर तपास पथक व संजय ठेंगे व पोलीस अंमलदार एकनाथ आव्हाड, विकास साळवे, जालिंदर साखरे यांचे संयुक्त पथक तयार करून ते छाप्यासाठी रवाना झाले. तपास पथकाने न्यू भरत हॉटेल येथे खात्री करण्याकरिता पथकातील पोलीस अंमलदार यांना संध्याकाळी बनावट ग्राहक म्हणून पाठविले.
तपास पथकास या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असण्याबाबत खात्री पटली, तेव्हा पंचांना घेऊन हॉटेलवर छापा टाकला, तेव्हा हॉटेलमध्ये विक्रम सुरेश विशनानी (वय – 27, रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी) यास ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून 20 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल व एक हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. विक्रम विशनानी याच्यासह हॉटेलची पाहणी केली असता, पहिल्या मजल्यावरील रूममध्ये तीन महिला आढळून आल्या. त्या महिलांकडे विचारपूस केली असता, त्यांनी आमच्याकडून वेश्याव्यवसाय करवून ग्राहकाकडून पैस घेतले जात होते. त्यातील काही पैसे आम्हास दिले जात असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने या तीन महिलांची सुटका केली आहे.
या छाप्यात पोलीस पथकाने विक्रम सुरेश विशनानी, फराद अहमद सय्यद (वय – 38, रा. राहुरी) हे आरोपी सापडले. या आरोपींविरोधात महिला कॉन्स्टेबल सारिका नारायण दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे.