
संभलमध्ये मशीद सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांच्यासह पाच खासदारांचे शिष्टमंडळ आज संभलला भेट देणार होते; परंतु योगी सरकारने दडपशाही केली. राहुल गांधी यांना गाजीपूर सीमेवर 3 तास रोखून धरले. यावेळी सीमेवर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तामुळे दिल्ली-मेरठ महामार्गावर 4 तास प्रचंड वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आज अटकाव केला असला तरी संभलमध्ये जाणारच असा निर्धार राहुल गांधी यांनी केला असून संभलला 6 डिसेंबरला जाणार असल्याची घोषणाच त्यांनी केली.
प्रचंड वाहतूककोंडीमुळे नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली. सरकारच्या आडमुठेपणाचा कामावर जाणाऱया नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. संभलमध्ये झालेल्या हिंसाचारात चारजणांचा मृत्यू झाला. शेकडोजण जखमी झाले. तेथे नेमके काय घडले होते, तेथील सध्याची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी राहुल गांधींना संभल येथे जायचे आहे. तेथील नागरिकांशी बोलून पीडितांचे सांत्वन करण्याचा या भेटीमागे हेतू आहे. परंतु, राहुल गांधी यांनी संभल येथे पोहोचू नये, सत्य बाहेर येऊ नये म्हणून सरकारने राहुल गांधी यांना संभल येथे जाण्यापासून रोखण्याची संपूर्ण तयारी केल्याचेच आज उघड झाले.
संभलमध्ये नेमके काय घडले हे जाणून घ्यायचेय
आम्हाला संभलमध्ये काय घडले ते जाणून घ्यायचे आहे. आम्हाला तेथील लोकांना भेटायचे आहे परंतु, मला राज्यघटनेने दिलेला अधिकारच बजावू दिला जात नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तर राहुल गांधी इतरांपेक्षा वेगळे आहेत. त्यांना अशाप्रकारे थांबवले जाऊ शकत नाही. संभलमधील पीडितांची भेट घेण्याचा अधिकार राहुल गांधी यांना राज्यघटनेने दिलेला आहे. त्यांना परवानगी दिली गेलीच पाहिजे, असे खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या.
भाजपा, आरएसएसने संविधानाच्या ठिकऱ्या उडवल्या – खरगे
राहुल गांधी यांना संभलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. यावरून भाजपा आणि आरएसएस संविधानाच्या अक्षरशः ठिकऱ्या उडवण्यात व्यस्त आहेत हेच सिद्ध होते, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवरून संताप व्यक्त केला. दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणे हीच भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी द्वेष निर्माण करण्याच्या शाखा उघडल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस सद्भावना, शांती, बंधुभाव आणि प्रेम पसरवण्यासाठी आपले दुकान उघडत राहील आणि समाजात एकजूट निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल. आम्ही झुकणार नाही आणि मागे हटणार नाही, असेही खरगे यांनी म्हटले आहे.
संविधान दाखवत संवाद
मी पोलिसांच्या वाहनातून संभल येथे एकटा जाण्यासाठी तयार आहे, असे राहुल गांधी यांनी पोलिसांना सांगितले. परंतु, पोलिसांनी ऐकले नाही. अखेर राहुल कारवर चढले. एका हातात माईक, दुसऱ्या हातात संविधान घेऊन त्यांनी भाषण केले.
भारतात राज्यघटनेच्या विरोधात काम सुरू आहे. परंतु आम्ही शेवटपर्यंत लढा सुरू ठेवणार. मला संभलमध्ये जाऊ दिले जात नाही. पोलीस लोकशाहीविरोधी वागत असून विरोधी पक्षनेता म्हणून घटनेने दिलेला अधिकार हिरावून घेत आहेत. – राहुल गांधी