
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल यांनी दिल्लीतील त्यांच्या ‘जनपथ’ या निवासस्थानी हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबातील चार सदस्यांशी संवाद साधला. यावेळी खासदार प्रियांका गांधीदेखील उपस्थित होत्या. याआधी 4 डिसेंबर रोजी राहुल आणि प्रियांका यांनी स्वतः संभलला जाण्याचा प्रयत्न केला; पण उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत त्यांना गाझीपूर सीमेवर रोखले. दरम्यान, संभलला जाण्यापासून पोलिसांनी रोखल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी ही कारवाई घटनाविरोधी असल्याचे म्हटले होते.