जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी

मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छेडलेल्या आंदोलनाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी आज दिले.

महाराष्ट्र बेचिराख होईल अशा जरांगे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय अशी परिस्थिती असल्याने या आंदोलनाची एसआयटी चौकशी केली जावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने विधानसभेत केली होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलाईनमधून विष देऊन आपल्याला संपवण्याचा कट रचला असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यानंतर ते फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेही होते, परंतु त्यांनी माघार घेत पुन्हा आंतरवाली सराटी गाठली होती. जरांगे यांच्या या आरोपांचे आणि त्यांच्या वक्तव्यांचे पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले.

भाजप आमदार आशीष शेलार यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मराठा आंदोलनाच्या बाबतीत दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये अशी टिप्पणी सोमवारी केली होती. तिचा दाखला शेलार यांनी यावेळी दिला. मराठा समाजाच्या भावना आणि मागण्यांबाबत सर्वांचेच एकमत आहे, पण महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार? ही केवळ धमकी आहे की त्यासाठी कटकारस्थान-योजना केली आहे का, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. कोपर्डी घटनेतील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन दगड मारा असे सांगितले गेल्याचा मराठा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यातील हृषीकेश बेदरे याच्याकडे गावठी पिस्तूल सापडले. प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर, राजेंद्र म्हस्के यांची घरे जाळली गेली. त्यामुळे याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी शेलार यांनी यावेळी केली. या सभागृहाचे कोण सदस्य या कटकारस्थानामध्ये होते, कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या याचा खुलासा झाला पाहिजे, त्यांना अटक करा, अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली.

बोलविता धनी शोधून काढणार – देवेंद्र फडणवीस
मनोज जरांगे-पाटील यांच्याशी माझे देणे घेणे नाही, पण त्यांचा बोलविता धनी कोण हे शोधून काढण्यासाठी या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. मनोज जरांगेंना आणणारे कोण आहेत, कोणाच्या कारखान्यावर बैठक झाली, कोणी दगड पुरवले, दगडफेक कोणी करायला सांगितली, आंदोलनासाठी पैसे कुठून येत आहेत, जालन्यात लाठीमार का झाला, संभाजीनगर, पुण्याला वॉर रूम कुणी उभारल्या, हे सर्व चौकशी करून बाहेर काढले जाईल, असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र अशांत ठेवण्यामागे कोण आहे? – मुख्यमंत्री
विधान परिषदेतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली. सुरुवातीला मराठवाडय़ातील मराठय़ांना आरक्षण देण्याची मागणी होती. नंतर राज्यभरातील मराठय़ांना आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मराठय़ांना आरक्षण देण्याची मागणी मान्य केली, तर ओबीसीमध्येच आरक्षण द्या, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र अशांत ठेवण्यामागे कोण आहे, याची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांचे जोरदार प्रत्युत्तर, जरांगेंवर आरोप करणारे आले कुठून
जरांगे हे साधे, सरळ व्यक्ती आहेत. राजकीय व्यक्ती नाहीत. शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीमार झाला. मुंबईकडे मोर्चा नेताना त्यांचा मुख्यमंत्र्यांशीही संवाद झाला. पण गुलाल उधळला गेल्यानंतरही आंदोलन पुन्हा का सुरू झाले, त्यांच्यावर आरोप करणारे आले कुठून, असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केले

तुषार दोषी जनरल डायरसारखे वागले, जरांगे यांच्या आंदोलना वेळी पोलीस अधिकारी तुषार दोषी हे जनरल डायरसारखे वागले, त्यावर सरकारने काय केले, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्र बेचिराख करू या गोष्टीचे समर्थन आम्ही करणार नाही, पण जरांगे हे कधीही राजकारणी नव्हते. त्यांना भडकावण्याचा प्रयत्न करून राजकारणी कुणी बनवले हे सर्वांना माहीत आहे, असे सांगत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला.

जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांचीही चौकशी करा
मनोज जरांगे-पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप गंभीर असून त्याचीही एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस आमदार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली. सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले की, सरकारने 8 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या आहेत. या मागण्या कशासाठी आणल्या आहेत? आधीच्या पुरवणी मागण्यांच्या पैशांचे काय झाले? असा सवाल पटोले यांनी केला.

जरांगेंना अतिरेकी ठरवणार का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

मनोज जरांगे-पाटील यांना त्यांचे नेमके काय चुकतेय ते सांगण्याचा प्रयत्न सरकार का करत नाही. उत्तरेतील शेतकरी दिल्लीत आंदोलनाला बसले होते तेव्हा त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत भाजपची मजल गेली होती, आता जरांगे-पाटलांना अतिरेकी ठरवणार का? म्हणजे कुणी न्याय्य हक्कांसाठी उतरायचेच नाही का? असाही संताप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जरांगे यांच्या एसआयटी चौकशीच्या मुद्दय़ावरून मिंधे सरकारला केला.

विधिमंडळात आज अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यानंतर विधान भवन परिसरात उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीबद्दल माध्यमांनी त्यांना विचारले. तसेच जरांगे यांचा बोलविता धनी म्हणून तुमच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजेश टोपे यांच्यावर आरोप केले जात आहेत, असे माध्यमांनी सांगितले. त्याला उत्तर देताना हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एखाद्याची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा ती पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणे राज्यकर्त्याचे काम असते, त्याला गुन्हेगार ठरवणे हे राज्यकर्त्याचे काम नसते, तसा राज्यकर्ता हा बिनकामाचा असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जरांगे-पाटील यांच्या मागे लागण्यापेक्षा त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.

मुंबईत इंडियाची बैठक झाली त्याच दिवशी संध्याकाळी जालनात आंदोलकांवर निर्घृण लाठीमार झाला होता. त्यांच्यावर अश्रूधूर सोडले गेले. छर्रे बंदुका वापरल्या गेल्या होत्या. त्या घटनेनंतर मी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आम्ही दोघेही जरांगेंसह आंदोलकांना भेटलो होतो. महिलांची डोकी फोडली गेली होती, अतिरेकी घुसलेत असे त्यांना वागवले गेले होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पोलीस महासंचालकांकडून घ्या रेकॉर्ड
सध्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला या फोन टॅपिंगमधल्या तज्ञ आहेत. जालनातील आंदोलकांना भेटल्यानंतर आमच्याकडून जरांगेंना कुणी आणि किती फोन गेले त्याचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून घ्यावा, असा खोचक सल्ला उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.

जरांगेंची चौकशी ‘चिवट’पणे करा
जरांगे-पाटील यांच्या मागे आम्ही आहोत असा सरकारचा आरोप असेल तर महिनाभरापूर्वी गुलाल कुणी उधळला होता? फटाके कुणी फोडले होते? अशीही विचारणा उद्धव ठाकरे यांनी सरकारला केली. ते फटाके आणि गुलाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी जरांगेंना आणून दिले होते. तोच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी जरांगेंची एसआयटी चौकशी करत असाल तर चौकशी ‘चिवट’पणाने करा, मधे सोडू नका, असा टोलाही लगावला.