केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे सहआयुक्त राहुल कुमार यांना अटक करणाऱ्या सीबीआयला विशेष न्यायालयाने दणका दिला. कुमार यांना केलेली अटक बेकायदा होती. अटकेसाठी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून कुमार यांना अटक करण्यात आली, असा ठपका ठेवत विशेष सीबीआय न्यायालयाने कुमार यांच्या सुटकेचा आदेश दिला. कुमार यांना गेल्या आठवडय़ात व्यावसायिकाला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याच्या आरोपावरून सीबीआयने अटक केली होती. ही कारवाई विशेष सीबीआय न्यायालयाने बेकायदा ठरवली आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीच्या बेकायदा कारवाईवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. त्यापाठोपाठ सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेला न्यायालयाने दणका दिला.