
>> राहुल गोखले
सुमारे पस्तीस वर्षे प्राध्यापक म्हणून आणि जवळपास पाव शतक एका प्रथितयश वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करणारे सुहास बारटक्के यांना प्रवासाची अतिशय आवड. त्या भटकंतीत आणि एकूणच जीवन प्रवासात अनेक माणसांशी त्यांचा संबंध आला. त्या वेळीही त्यांच्यातील वार्ताहर जागा असल्याने असेल; पण जिज्ञासेपोटी त्या व्यक्तींबद्दल त्यांनी जाणून घेतले; त्यांच्याशी संपर्कात राहिले आणि मग त्या अगणित व्यक्तींपैकी काहींशी त्यांचे कायमचे स्नेहबंध जुळले. अशा काही व्यक्तींबद्दल बारटक्के यांनी `प्रवासात भेटलेली माणसे’ या पुस्तकात लिहिले आहे. मोजक्या शब्दांत त्या व्यक्तिमत्त्वाची स्वभाव वैशिष्टय़े, त्यांची कार्यशैली, त्यांच्या अंगचे गुण यांचा परिचय या लेखांतून लेखकाने करून दिला आहे.
लेखकाने एकवीस व्यक्तींवर लिहिले आहे. बांधकाम क्षेत्रातील प्रथितयश नाव असणारे सुधीर निरगुडकर यांच्या त्या क्षेत्रातील यशापयशाच्या अनुभवांबद्दल लिहितानाच लेखकाने निरगुडकर आपल्या नफ्यातील काही भाग समाजसेवेवर कसा खर्च करतात यावरही लिहिले आहे. अष्टविनायक मंदिरांच्या परिसरात निरगुडकर यांनी स्वच्छतागृहे बांधून दिली आहेत आणि तीही मोफत. मात्र तेथे कुठेही त्यांनी स्वतची जाहिरात केलेली नाही.
रत्नागिरीच्या समुद्रात पकडलेल्या माशांपैकी जे येथे खाण्यात वापरले जात नाहीत, पण परदेशात त्यांना योग्य मोबदला मिळू शकतो अशा माशांच्या पेस्टच्या स्वरूपात निर्यात सुरू करण्याचे श्रेय ज्यांच्याकडे जाते ते दीपक गद्रे यांच्याविषयी लेखकाने लिहिले आहे. खेकडय़ांच्या नूडल्सपासून नारळाच्या दुधातील खेकडा सूपपर्यंत अनेक पदार्थांच्या माध्यमातून गद्रे यांची ओळख जागतिक स्तरावर निर्माण झाली आहे. याचा आलेखच लेखकाने थोडक्यात मांडला आहे. सहकारी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे अरुण नरके यांच्या बहुपेडी जीवनाबद्दल लेखकाने आत्मीयतेने लिहिले आहे. ज्या घुबडाला अशुभ मानले जाई वा जाते अशा पक्ष्यावर संशोधन करणारे, पक्ष्यांचे मनोहारी छायाचित्रण करून त्यांची प्रदर्शने भरवून सामान्यांमध्ये निसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणारे `आऊल मान’ डॉ. सतीश पांडे यांच्या कामाचे वर्णन वाचून थक्क व्हायला होईल. प्रकाशन क्षेत्रातील दिग्गज वि. ग. तथा आप्पा परचुरे यांच्या प्रकाशक म्हणूनच्या कामगिरीवर लिहितानाच लेखकाने त्यांच्यातील दर्दी खवय्यावर प्रकाश टाकला आहे.
गोव्यात पर्यटक सेवा कंपनी सुरू करून यशस्वी झालेले ताहिरभाय परकार यांच्यातील सेवाभाव; तब्बल 57 समाजकंटकांना, गुन्हेगारांना चकमकीत ठार करणारे प्रफुल्ल जोशी यांच्यातील साहित्याची उत्तम जाण अशा आगळ्या वैशिष्टय़ांच्या वर्णनाने पुस्तकाची वाचनीयता वाढली आहे. काही महिला सहकाऱयांसह स्वत चारचाकी वाहन चालवत बावीस देशांचा प्रवास करून तेथील मातांचे प्रश्न जाणून घेणाऱया, `मदर्स ऑन व्हील’च्या प्रवर्तक माधुरी सहस्रबुद्धे या `नॅक’ संस्थेचे प्रमुख डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या पत्नी; पण आपल्या स्वतंत्र कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे याचा प्रत्यय यातून येतो. कोकणातल्या कुडावळे येथे एका देवराईच्या टोकाला असणाऱया; ना वीज, ना टेलिफोन, ना मोबाइल अशा माणसाच्या कमीत कमी गरजा भागवणाऱया घरात राहणारे; पण जगभरच्या निसर्गाची ािढयाशील चिंता वाहणारे दिलीप आणि डॉ. पौर्णिमा कुलकर्णी हे दांपत्य, कर्नल काणे, वसईचा मनस्वी मिल्टन अल्मेडा, रेल्वेच्या डब्यात अवचित भेट झालेले, पण नंतर त्याचे रूपांतर स्नेहात झालेले फौजी कमल अशा अनेकांवर लेखकाने आपुलकीने लिहिले आहे. वाईमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापक असलेल्या, पण वाई-सातारा रस्त्यावर स्वखर्चाने मांजर आणि श्वानांसाठी अनाथालय सुरू करणाऱया महिलेच्या वाटचालीचे वर्णन `कुत्रेवाली मॅडम’मध्ये वाचायवास मिळेल. अन्य लेखही वाचनीय आहेत. सागर नेने यांचे मुखपृष्ठ वेधक.
प्रवासात भेटलेली माणसे
लेखक: सुहास द. बारटक्के
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
पृष्ठे : 104; मूल्य : रुपये 190