राहुल गांधींची भारत जोडो आता ईव्हीएमविरोधात 

काँग्रेस कार्यकारिणीच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीत अजेंडा ठरवण्यात आला. ईव्हीएम आणि पारदर्शी वातावरणात निवडणुका न घेणाऱया निवडणूक आयोगाविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा 3.0’च्या माध्यमातून मोहीम उघडण्यात येणार आहे. ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनमत तयार करण्यात येणार आहे. बोगस मतदारांवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येणार आहेत.

बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक मुद्दय़ांवर बोट ठेवले. महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खरगे यांनी बैठकीत ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. तसेच देशात निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची घटनात्मक जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्यावर त्यांनी जोर दिला.

रणनीती सुधारावी लागेल

आपल्याला रणनीती सुधारावी लागतील. चुकीची माहिती आणि चुकीच्या माहितीचा प्रतिकार करण्याचे मार्ग शोधून ते विकसित करावे लागतील. कालबद्ध रणनीती आखून पक्ष मजबूत करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी वर्षभर आधीच करावी लागेल, मतदार याद्या तपासाव्या लागतील, इत्यादी महत्वपूर्ण मुद्दे खरगे यांनी मांडले. अगदी बूथ लेव्हलपर्यंत पक्ष संघटना मजबूत करावी लागेल. दिवस-रात्र सतर्क राहावे लागेल, असेही ते म्हणाले.

पक्ष मजबुतीसाठी वरपासून खालपर्यंत बदल करावे लागतील

वरपासून खालपर्यंत पक्ष मजबूत करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, काही बदल करावे लागतील असे खरगे म्हणाले. पक्षांतर्गत भांडणांवरून तसेच आरोप-प्रत्यारोपांवरूनही खरगेंनी बैठकीत कानउघडणी केली. पक्षातच एकता नसून आपल्याच नेत्यांविरोधात उघडपणे वक्तव्ये करणे पक्षासाठी अत्यंत घातक ठरू शकते याकडेही खरगे यांनी नेत्यांचे लक्ष वेधले. आपण एकत्र निवडणूक लढवत आहोत आणि एकमेकांविरोधातच उघडपणे वक्तव्ये करू लागलो तर आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना कसे पराभूत करू शकू, असा सवालही खरगे यांनी यावेळी केला.

निकाल पाहून चाणक्यही संभ्रमात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालाची आकडेवारी समर्थनीय नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ज्याप्रकारे कामगिरी केली ते पाहता विधानसभा निकाल पाहून भले भले चाणक्यही संभ्रमात पडले असल्याचे खरगे म्हणाले. राज्यातील निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी हे आव्हान आहे. पक्षश्रेष्ठींमध्ये ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे निवडणुकीत आपले नुकसान होत असून कडक शिस्तीची गरज असल्याचे खरगे म्हणाले.