राहुल गांधी लवकरच हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेणार

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 123 जणांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी लवकरच राहुल गांधी हाथरस दौऱ्यावर जाणार आहेत. काँग्रेसचे सरचिचणीस केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. ‘हाथरसची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. राहुल गांधी लवकरच हाथरसला जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेतील’, असे वेणुगोपाल यांनी सांगितले.

सत्संगमधील चेंगराचेंगरीनंतर भोले बाबा फरार झाला आहे. भोले बाबाच्या सेवेदारांच्या अटकेसाठी पोलीस हाथरस, एटा, कासगंज, मैनपुरी, इटावा, फरुखाबाद, मथुरा, आग्रा आणि मेरठसह अनेक ठिकाणी छापेमारी करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 30 हून अधिक सेवेदारांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.