
गुजरातमध्ये कॉँग्रेसचा सातत्याने होणारा पराभव आणि पक्ष संघटना वाढीसाठी नेत्यांकडून होणारे दुर्लक्ष यावरून कॉँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी चांगलेच संतापले. गुजरात कॉँग्रेसमध्ये भाजपची एक बी टीम कार्यरत असल्यानेच येथे यश मिळत नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी स्वपक्षातील गद्दार नेत्यांची आज पोलखोल केली.
गुजरात दौऱयावर असलेल्या राहुल गांधी यांनी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. येथे दोन प्रकारचे लोक आहेत. एक ज्यांच्या मनात काँग्रेसची विचारधारा आहे. दुसरे असे नेते जे जनतेपासून दूर आहेत. त्यातील काही भाजपाच्या जवळ आहेत. जोपर्यंत आम्ही या लोकांना वेगळे करत नाही तोपर्यंत जनता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. जनतेला कॉँग्रेस हवी, भाजपची बी टीम नको आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
10 ते 30 नेत्यांना पक्षाबाहेर हाकलावेच लागेल
पक्षात गटबाजी करणाऱयांना वेगळं करण्याची जबाबदारी माझी आहे. पक्षात नेत्यांची कमतरता नाही. आमच्याकडे बब्बर शेर आहे. गद्दारी करणाऱया त्या 10, 15, 20, 30 नेत्यांना पक्षाबाहेर हाकलावेच लागेल, असा इशारा राहुल यांनी दिला.