लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांनी मिळून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत पहिलेच भाषण खणखणीत झाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला. मणिपूर हिंसाचार, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपची सालटी काढली.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून घेरले होते. आता हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरला राहुल गांधी भेट देणार आहेत.
राहुल गांधी येत्या सोमवारी म्हणजेच 8 जुलैला मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या नागरिकांच्या वेदना ते जाणून घेणार आहेत. राहुल गांधी हे मणिपूरमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांत जावून नागरिकांच्या भेटी घेऊन माहिती घेणार आहेत. मणिपूरचा राहुल गांधी यांचा हा तिसरा दौरा असेल. मात्र विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांचा हा पहिलाच दौरा आहे.
राहुल गांधी यांच्या मणिपूर दौऱ्याची माहिती राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. मेघचंद्रा यांनी दिली. राहुल गांधी हे दिल्लीहून विमानाने सिलचर येतील. तिथून ते जिरीबम जिल्ह्यात जातील. जिरीबम जिल्ह्यात 6 जूनला नुकतीच हिंसाचाराची घटना घडली आहे, मेघचंद्रा यांनी सांगितले. यासोबतच जिरीबम जिल्ह्यातील काही शरणार्थी शिबिरांना भेट देतील.त्यानंतर राहुल गांधी हे पुन्हा सिलचर विमानतळावर जातील आणि तिथून इम्फाळसाठी विमानाने रवाना होतील, असे मेघचंद्रा म्हणाले. इम्फाळला उतरल्यानंतर राहुल गांधी चुराचंदपूर जिल्ह्यात जातील. तिथे ते शरणार्थी शिबिरातील नागरिकांशी संवाद साधतील, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली.