लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर झाले. अनेक जागांवर इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडणूक जिंकले आहेत. नियमानुसार त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. ती जागा कोणती असेल यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते की, मी रायबरेली आणि वायनाड अशा दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे. मी दोन्ही मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो. मी आधी चर्चा करेन आणि मगच हा निर्णय घेईन की मी कोणत्या मतदारसंघाचा खासदार म्हणून संसदेत जाईन, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं होतं.
केरळच्या वायनाड मतदारसंघात दुसऱ्यांदा राहुल गांधी हे निवडून आले आहेत. यंदा त्यांनी सीपीआयचे एनी राजा यांचा 3 लाख 64 हजार मतांनी पराभव केला. तर त्यांनी यंदा त्यांच्या आई सोनिया गांधी यांचा मतदारसंघ राहिलेल्या रायबरेली इथूनही चांगल्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे रायबरेली या मतदारसंघातून ते खासदार म्हणून जाणार असल्याच्या चर्चा आहेत. राहुल गांधी वायनाड येथील जागा सोडतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, अद्याप गांधी यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.