लसूण 400 पार! महागाईने सामान्यांचं कंबरडं मोडलं, सरकार कुंभकर्णाच्या झोपेत; राहुल गांधी यांचा निशाणा

लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदरा राहुल गांधी यांनी महागाईवरून केंद्र सरकारला घेरले आहे. वाढत्या महागाईवर राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी वेगवेगळ्या भाज्यांचे भाव विचारताना दिसत आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत खरमरीत शब्दांतून टीकाही केली आहे. लसूण कधीकाळी 40 रुपये किलो होता, आज 400 पार गेला आहे. वाढत्या महागाईने सामान्यांचे बजेट बिघडले आहे. सरकार कुंभकर्णाच्या झोपेत आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

राहुल गांधी हे भाजीपाला बाजारात वेगवेगळ्या भाज्यांचे भाव विचारताना व्हिडिओत दिसत आहेत. यासोबतच महागाईचा सामना करणाऱ्या महिलांशीही ते चर्चा करताना दिसत आहेत. महागाईमुळे आपल्या कुटुंबाला कसा सामना करावा लागतोय, या व्यथा महिलांनी राहुल गांधी यांना सांगितल्या. सोने स्वस्त होईल, पण लसून नाही, असे एक महिला या व्हिडिओत राहुल गांधी यांना सांगतेय.