…तर आम्ही 50 टक्क्यांची मर्यादा हटवू; आरक्षणावरून राहुल गांधी यांचे PM मोदींना आव्हान

पुण्यात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी भाजप, आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ‘ही लढाई संविधान वाचवण्याची आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदी हे, आरएसएस हे संविधान संपवण्याचा घाट घालत आहेत. हे संविधान बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी मिळून हिंदुस्थानच्या जनतेसोबत कित्येक वर्षे संघर्ष करून संविधान देशाला दिले. हे संविधान नरेंद्र मोदी आणि भाजप बदलवण्याच्या आणि संपवण्याच्या प्रयत्न करत आहेत’, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

संविधानामुळेच हिंदुस्थानातील गरीबांना, शेतकऱ्यांना, मागासवर्गीयांना, दलितांना, आदिवासींना, अल्पसंख्यकांना आणि दुर्बल घटकांना हक्क मिळतात. संविधानाशिवाय तुम्ही काहीच नाही. जे काही तुमच्याकडे आहे ते सर्व 20-25 धनाढ्यांच्या हाती जाईल. मनरेगा, भूसंपादन कायदा, हरित क्रांती, धवल क्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण हे सर्व संविधानामुळे झालं आहे. ज्या दिवशी संविधान संपेल, ज्या दिवशी भाजप खरंच हे संविधान संपवेल तेव्हा तुम्ही हिंदुस्थान ओळखू शकणार नाही. आंबेडकर आणि महात्मा गांधींनी जे दिलं, ते (संविधान) आपण संपवू देणार नाही, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

भाजपचे नेते कधी संविधान बदलवण्याची भाषा करतात, तर कधी म्हणतात आरक्षण संपवून टाकू. मोदींनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. आरक्षणाची जी 50 टक्क्यांची मर्यादा घातली आहे, ती हटवणार हे फक्त मोदींनी कुठल्याही भाषणात जाहीर करावं, असं आव्हान राहुल गांधी यांनी दिलं. आरक्षणावर घातलेलील 50 टक्क्यांची कृत्रिम मर्यादा ज्यामुळे कोट्यवधी नागरिकांचे नुकसान होत आहे, ती आम्ही निवडणुकीनंतर सत्तेत आल्यावर हटवून टाकू, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी यांनी दिली.