
सरकार एकीकडे महात्मा फुले यांना दिखाऊ नमन करत आहे आणि दुसरीकडे त्यांच्या आधारावर सिनेमा सेंसर करत आहे, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दलित आणि बहुजानांचा इतिहास दाबू पहात आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी एक्सवरून केला.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जातिवादाविरोधात आयुष्यभर संघर्ष केला. परंतु सरकार त्यांचे योगदान मोठ्या पडद्यावर येण्यापासून रोखू पहात आहे. भाजप आणि आरएसएस प्रत्येक पावलावर दलित आणि बहुजनांचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून सामाजिक अन्यायाचे सत्य लोकांसमोर येणार नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
इतिहास तोडून-मोडून सादर करण्याचा प्रयत्न
सत्य दाबण्याचे षडयंत्र रचले जात असून सेंसॉर बोर्डाच्या माध्यमातून इतिहास तोडून-मोडून सादर करण्याचे राजकारण आता उघडपणे समोर येत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे देशात सामाजिक न्याय, महिला शिक्षण आणि जातिव्यवस्थेविरोधात लढण्यासाठीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. दलित आणि बहुजनांच्या आंदोलनात आजही फुले यांचे योगदान प्रेरणेचा स्रोत म्हणून गणले जाते याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे.
रोजगार प्रोत्साहन योजना आणखी एक जुमला आहे का?
रोजगार प्रोत्साहन योजना हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एक जुमला आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी रोज नवीन घोषणा करतात. परंतु देशातील युवक खऱया संधीची वाट पहात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मोदींनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत रोजगार प्रोत्साहन योजनेची वाजतगाजत घोषणा केली. या योजनेची घोषणा होऊन वर्ष होत आले. परंतु सरकारने अद्याप काहीच केलेले नाही. योजनेसाठी केलेली 10 हजार कोटींची तरतूदही परत करण्यात आली आहे. यावरून पंतप्रधान बेरोजगारीबद्दल किती गंभीर आहेत हे दिसते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अदानी आणि अरबपती मित्रांना समृद्ध बनवण्यापासून आपले लक्ष्य हटवून कधी युवकांना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करणार, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.