जात जनगणनेशिवाय देशातील सर्वांचा विकास होऊ शकत नाही. काही झाले तरी देशात जात जनगणना होणारच. लोकसभा आणि राज्यसभेत आम्ही 50 टक्के आरक्षण मर्यादेची भिंत तोडू, असे सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आज जोरदार हल्ला चढवला.
बिहारची राजधानी पाटणा येथे ‘संविधानाचे संरक्षण’ या विषयावर आयोजित परिषदेत मार्गदर्शन करताना राहुल गांधी जात जनगणनेच्या मुद्दय़ावरून पेंद्रातील मोदी आणि बिहारमधील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील सरकारवर निशाणा साधला. देशातील जातींची खरी परिस्थिती शोधणे आवश्यक आहे. मी संसदेत पंतप्रधान मोदींना सांगितले की, आम्ही तुमच्यासमोर जात जनगणना लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेऊ. जात जनगणना ही देशासाठी एक्स-रे आणि एमआरआयसारखी आहे. कोणत्या वर्गात किती लोक आहेत, यातून कळेल, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
मागासवर्गीय, दलित लोक प्रतिनिधित्व घेत असल्याचे मोदींना कळले तेव्हा त्यांनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिले, पण सत्ता हिसकावून घेतली. अंबानी, अदानी आणि आरएसएसला सत्ता दिली आहे. प्रत्येक संघटनेत त्यांनी आपली माणसे बसवली आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजप खासदार बोलू शकत नाहीत, ते पिंजऱ्यात बंद
हिंदुस्थानची सर्व संपत्ती फक्त दोन ते तीन लोकांच्या हातात गेली पाहिजे असे घटनेत कुठे लिहिले आहे? आजच्या हिंदुस्थानात आमदार-खासदारांना सत्ता नाही. भाजपच्या मागासवर्गीय, दलित, आदिवासी खासदारांना मी भेटतो तेव्हा ते म्हणतात की आम्हाला पिंजऱ्यात बंद केले आहे, बोलू शकत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
बिहारमधील जात गणना खोटी
बिहार हे पेपरफुटीचे केंद्र बनले आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही. महागाई वाढत आहे. देशाची खरी सामाजिक आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी जातीय जनगणना व्हायला हवी. बिहारमध्ये करण्यात आलेली जात गणना ही खोटी असल्याचे राहुल गांधी म्हणाले.