लाजिरवाणे अन् धक्कादायक! रामपूरमध्ये 11 वर्षांच्या मूकबधिर दलित मुलीवर बलात्कार; राहुल गांधींचा BJP वर घणाघात

उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे 11 वर्षांच्या मूकबधिर दलित मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर काँग्रेस खासदार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारतीय जनता पक्षाच्या दलित आणि महिलाविरोधी धोरणामुळे उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहेत, असा घणाघात राहुल गांधी यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करून केला आहे.

पीडित मुलगी मंगळवारपासून बेपत्ता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती एका शेतामध्ये बेशुद्धावस्थेत सापडली होती. तिच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते आणि चावल्याच्याही खुणा होत्या. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी योगी सरकारवर हल्ला चढवला.

उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे 11 वर्षांच्या दलित मुलीवर झालेला अत्याचार आणि क्रूरता अत्यंत लाजिरवाणी आणि धक्कादायक बाब आहे. उत्तर प्रदेशमध्ये सतत घडणाऱ्या अशा गुन्ह्यांवरून हेच स्पष्ट होते की भाजप सरकारच्या काळामध्ये दलित आणि विशेषत: मुली पूर्णपणे असुरक्षित आहेत, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गुन्हेगारांवर कायदा-सुव्यवस्थेचा वचक नाही आणि पीडिता असहाय्य आहेत, हा भाजपच्या दलित आणि महिलाविरोधी मानसिकतेचा परिणाम आहे. उत्तर प्रदेशमधील मुली आणखी किती दिवस अशा क्रूरतेला बळी पडत राहणार? असा सवालही राहुल गांधी यांनी केला. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून पीडिता आणि तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणीही राहुल गांधी यांनी केली.

आरोपीला अटक

दरम्यान, पीडित मुलीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. पीडिता गुंगी आणि बहिरी असून तिच्यावर अज्ञाताने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत पीडितेच्या घराशेजारी राहणाऱ्या दान सिंह याला अटक केली. त्याने मुलीला फूस लावून जंगलामध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला शेतामध्ये टाकून तो फरार झाला होता. पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी आत्मरक्षणासाठी गोळीबार केला, यात आरोपी जखमी झाला, अशी माहिती रामपूर पोलिसांनी दिली.