Paper Leak – 6 राज्यांमधील 85 लाख मुलांचे भविष्य धोक्यात, पेपरफुटीवर राहुल गांधींनी केंद्र सरकारला केलं लक्ष्य

पेपरफुटीमुळे देशभरातील 6 राज्यांमधील 85 लाख मुलांचे भविष्य धोक्यात आलं आहे. यावरूणच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटीवरून भाजपवर तीव्र हल्ला चढवला आहे. X वर एक पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, ”6 राज्यांमधील 85 लाख मुलांचे भविष्य धोक्यात आहे. पेपरफुटीमुळे हा आपल्या तरुणांसाठी सर्वात धोकादायक ‘पद्मव्यूह’ बनला आहे.”

राहुल गांधी म्हणाले की, “पेपरफुटीमुळे मेहनती विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय अनिश्चितता आणि तणावात ढकलले जातात. त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांच्यापासून हिरावलं जातं. यामुळे पुढच्या पिढीला चुकीचा संदेश जातो की, अप्रामाणिकपणा हा कठोर परिश्रमापेक्षा चांगला असू शकतो, जे पूर्णपणे चुकीचे आहे.”

केंद्र सरकारवर टीका करत राहुल गांधी म्हणले, “नीट पेपरफुटी प्रकरणाला देश हादरवून टाकून एक वर्षही झालेलं नाही. आमच्या विरोधानंतर मोदी सरकारने नवीन कायद्याच्या मागे लपत याला उपाय म्हटलं. पण अलीकडील अनेक पेपरफुटीमुळे हे देखील अपयशी ठरल्याचं दिसत आहे.”

ते पुढे म्हणाले, “ही गंभीर समस्या एक सिस्टिमॅटिक फेलियर आहे. हे तेव्हाच संपू शकते जेव्हा सर्व राजकीय पक्ष आणि सरकारे आपले मतभेद विसरून एकत्रितपणे ठोस पावले उचलतील. या परीक्षांची प्रतिष्ठा राखणे हा आपल्या मुलांचा अधिकार आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत संरक्षित केला पाहिजे.”