भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे जवानांचे नाहक बळी, राहुल गांधी संतप्त

जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील जंगलात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यांसह चार जवान शहीद झाले आहेत. गेल्या दहा दिवसातली ही दुसरी घटना असून आतापर्यंत दहा जवान शहीद झाले आहेत. यावरून सध्या देशभरात संतापाचे वातावरण आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ”भाजपच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम जवान व त्यांच्या कुटुंबियांना भोगावे लागत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

”आज पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाले. एकामागून एक अशा भयंकर घटना अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहेत. सातत्याने होत असलेले हे दहशतवादी हल्ल्यांवरून जम्मू-कश्मीरची बिकट स्थिती उघड करत आहेत. भाजपच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम आमचे जवान आणि त्यांचे कुटुंबीय भोगत आहेत.वारंवार होणाऱ्या या चुकांची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारून देशाच्या आणि जवानांच्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी, ही प्रत्येक देशभक्त नागरिकांची मागणी आहे. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा आहे”, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.