
शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील वांगी येथे झाला, या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
राहुल गांधी यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली पण ही माफी त्यांनी पुतळ्याचे काम आरएसएसच्या व्यक्तीला दिले, त्यात भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली का? असा सवाल विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे असे म्हणाले. शेतकरी आंदोलनात 700 शेतकरी शहीद झाले, नोटबंदीमुळे लघु, छोटे, मध्यम उद्योग संपवले व लाखो लोकांचे रोजगार घालवले, चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावला त्याबद्दलही माफी मागा, असे राहुल गांधी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, गोवा दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, माजी आमदार मोहनदादा कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विक्रम सावंत, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचा स्वाभिमानी मोदींकडे गहाण ठेवू नका – मल्लिकार्जुन खरगे
”महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मजबूत आहे, त्याला कोणीही हलवू शकत नाही. तीन पक्ष मिळून चांगले काम करत आहोत. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’चा संदेश दिला आहे, न घाबरता काम करा. भाजपा युती सरकार गुजरातच्या इशा-यावर काम करत आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी मोदींकडे गहाण ठेवू नका. लोकसभेप्रमाणेच भरघोस पाठिंबा देत विधानसभेला मविआचे सरकार आणा, असे आवाहन करुन महाराष्ट्रात मविआचे सरकार आले की केंद्रातील मोदी सरकारही जाईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले. खरगे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श, प्रेरणास्रोत आहेत पण नरेंद्र मोदींचा हात त्यांच्या पुतळ्याला लागताच पुतळा कोसळला. मोदींनी गुजरातमध्ये पुलाचे उद्घाटन केले तो पडला, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले, त्याला गळती लागली. नरेंद्र मोदी हे मतांसाठी दिखाव्याचे काम करतात. घाईघाईत पुतळा बनवल्याने तो कोसळला व महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान झाला.