नरेंद्र मोदींच्या अमृतकाळात सामान्यांचा रिकामा खिसाही कापला जातोय, राहुल गांधी यांची टीका

सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान एनडीए सरकारला अक्षरशः फोडून काढले होते. त्यानंतर मंगळवारी देखील राहु गांधी यांनी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली सामान्यांच्या होणाऱ्या लूटीवरून केंद्र सरकारला फटकारले आहे.

”नरेंद्र मोदींच्या अमृतकाळात सामान्यांचा रिकामा खिसाही कापला जातोय. उद्योगपती मित्रांचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ करणाऱ्या या सरकारने देशातील गरिब जनता जी अकाऊंटमध्ये मिनिमम बँलन्स नाही ठेवू शकत त्यांच्याकडून तब्बल 8500 कोटी उकळले आहेत. ‘दंडाचं तंत्र’ हे मोदींच्या चक्रव्ह्यूहाचे ते दार आहे ज्याद्वारे ते सामान्य देशवासियांचे कंबरड मोडायचा प्रयत्न करत आहेत. पण लक्षात ठेवा देशाची जनता ही अभिमन्यू नाही. अजून आहे. ते चक्रव्ह्यूला तोडून त्यांच्यावरील अत्याचाराला उत्तर देतील’, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान एनडीए सरकारला अक्षरशः फोडून काढले. प्रचंड आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांना सत्ताधाऱ्यांनी गदारोळ करून थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, राहुल गांधी यांनी आपल्या शैलीत अर्थसंकल्पातील पोकळ तरतुदींवर जोरदार घणाघात केला. राहुल गांधी म्हणाले, अर्थसंकल्पात इंडेक्सेशन रद्द करून पाठीत खंजीर खुपसला तर कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणजेच भांडवली नफ्यावरील कर वाढवून छातीत खंजीर खुपसला. हा कर 10 वरून 12 टक्क्यांपर्यंत नेला. ही अत्यंत दुःखद बाब आहे. मात्र, इंडिया आघाडीसाठी हा एक छुपा फायदा आहे. कारण, मध्यमवर्गीय आता तुम्हाला सोडून जात आहेत आणि आमच्याकडे येत आहेत, असा सणसणीत टोलाही राहुल गांधी यांनी एनडीए सरकारला लगावला.