भाजपच्या भय अन् भ्रमाचं जाळं तुटलं…; पोटनिवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांचा निशाणा

लोकसभा निवडणुकीचे निकाल गेल्या महिन्या लागले. या निवडणुकीत बहुमत गमवल्याने भाजपला मोठा धक्का बसला. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालने भाजपला सलग दुसरा धक्का बसला आहे. देशातील 7 राज्यांमधील विधानसभेच्या 13 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजपचा धुव्वा उडला आहे. ‘इंडिया’ आघाडीने 13 पैकी 10 जागा जिंकून भाजपला दणका दिला आहे. या निकालानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

‘देशाची जनता ‘इंडिया’ आघाडीसोबत’

भाजपने तयार केलेल्या भय आणि भ्रमाचं जाळं तुटलं आहे, हे सात राज्यांमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. शेतकरी, तरुण, मजूर, व्यापारी आणि नोकरदारांसह प्रत्येकाला हुकूमशाही उखडून टाकून न्यायाचे राज्य स्थापन करायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

विधानसभा पोटनिवडणुकीचे सकारात्मक निकाल आले आहेत. यासाठी आम्ही जनतेचे आभारी आहोत. जिथे-जिथे काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान झाले आहे, त्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.

”इंडिया’ आघाडीला मिळाले समर्थन’

सात राज्यांमध्ये विधानसभेच्या तेरा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत देशाच्या जनतेने ‘इंडिया’ आघाडीला समर्थन दिले आहे. देवभूमी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन, असे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या.

‘जनतेने भाजपला नाकारले’

विपरीत परिस्थितीत सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेहन आणि प्रयत्न केल्याने त्या सर्वांना अभिवादन करतो. भाजपचा अहंकार, कुशासन आणि नकारात्मक राजकारणाला जनतेने साफ नाकारले आहे, हे पोटनिवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.