लोकसभा निवडणुकीत भाजपचे संपूर्ण राजकारण अयोध्येवर केंद्रित होते; पण इंडिया आघाडीने त्यांचा अयोध्येत पराभव केला. तसाच आता गुजरातमध्येही करणार. काँग्रेस कार्यकर्ते कुणालाही घाबरत नाहीत. भाजपने अहमदाबादमध्ये आमचे कार्यालय पाडले. त्याचप्रमाणे आता आम्ही त्यांचे सरकार पाडणार, अशा शब्दांत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला.
गुजरात दौऱयावर असलेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. निवडणुकीपूर्वी तुम्हाला अयोध्येत भाजपचा पराभव होईल असे वाटले होते का? तुम्हाला वाटले असेल की, पंतप्रधान मोदी इतक्या अडचणीने निवडणूक जिंकतील. अयोध्येत जसा भाजपला पराभव पत्करावा लागला तसाच आता गुजरातमध्येही होईल. गुजरातची जनता न घाबरता लढली तर भाजपचा निश्चित पराभव होईल, असे राहुल गांधी कॉँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
मोदी कुणालाच आवडत नाहीत
z मोदी कोणालाच आवडत नाहीत. एका माणसासमोर पक्षाचा कार्यकर्ता हवालदिल झाला असून आरएसएसची हवा निघून गेली, पण काँग्रेसमध्ये असे होत नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यासमोर कार्यकर्ता उभा राहू शकतो, असे राहुल गांधी म्हणाले.
पराभवाच्या भीतीने वाराणसीला पळाले
z अयोध्येतील लोकांमध्ये भाजपबद्दल प्रचंड राग आहे. लोकांची घरे, दुकाने पाडली. आजपर्यंत नुकसानभरपाई मिळालेली नाही. अयोध्येतून विजयी झालेल्या खासदाराने मला सांगितले की, नरेंद्र मोदींना वाराणसीतून नव्हे, तर अयोध्येतून लढायचे होते; पण तिथल्या सर्वेक्षणकर्त्यांनी त्यांना सांगितले की, अयोध्येतून लढलात तर तुमचा पराभव होईल. त्यामुळे ते वाराणसीला पळाले. वाराणसीत आमची छोटीशी चूक झाली, अन्यथा आम्ही तिथे जिंकलो असतो, असे राहुल गांधी म्हणाले.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे आंदोलन
z राहुल यांच्या कथित हिंदुत्वविरोधी वक्तव्याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.