धर्म आणि जातीच्या नावाने द्वेष पसरवला जातोय!

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशात हिंसाचार आणि द्वेष पसरवत आहेत. भाजप-संघ लोकांना धर्म, जाती आणि भाषेच्या नावावर एकमेकांशी भांडण्यासाठी चिथावणी देत आहेत, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ही आज बिहारच्या किशनगंज येथे पोहोचली. त्या वेळी राहुल गांधी बोलत होते. या यात्रेला मोठी गर्दी होती.

किशनगंजमध्ये पोहोचल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी बिहारमध्ये राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत केले. राहुल गांधी यांची किशनगंज जिह्यानंतर मंगळवारी पूर्णिया आणि त्यानंतर बुधवारी कटिहार येथे रॅली होणार आहे. त्यानंतर झारखंडमार्गे पुन्हा बिहारमध्ये परततील. बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव दीपाशंकर भट्टाचार्य यांना रॅलीत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

मंत्री रावसाहेब दानवेंच्या बॅनरला मराठा आंदोलकांनी फासले काळे

भारतीय जनता पार्टी ही दुटप्पी भूमिका घेत असल्याचे राज्यभरात दिसून येत आहे. शहरातील मुख्य चौकाचौकात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भास्कर दानवे यांचे फोटो असलेले बॅनर लावत मराठा आरक्षण दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व भास्कर दानवे यांच्या बॅनरला काळे फासत निषेध व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने कुठलाही प्रकारची भूमिका पूर्ण केली नाही. कुठलीही भूमिका ठोस मराठा आरक्षणाच्या बाजूने भारतीय जनता पार्टीने किंवा कार्यकर्त्यांनी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बजावली नाही. नुसते श्रेय घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बॅनरला काळे फासत निषेध करत इशारा देण्यात आला.