दलित, मुस्लिम, ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली, राहुल गांधी यांची कबुली

दलित, मुस्लिम, ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली, अशी कबुली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. काँग्रेसचे दोन दिवसीय 84 वे अधिवेशन आजपासून अहमदाबाद येथे सुरू झाले. त्यावेळी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेस जेव्हा मुस्लिमांबद्दल, खासकरून अल्पसंख्याकांबद्दल बोलते तेव्हा आमच्यावर टीका होते; परंतु पक्षाने असे मुद्दे उचलले पाहिजेत, कुणालाही न घाबरता आपले म्हणणे मांडले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. भाजप आणि आरएसएसची विचारधारा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारधारेच्या विपरीत आहे.

या दोघांचेही देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात कुठल्याही प्रकारचे योगदान नसताना ते स्वतःला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचे वारसदार मानतात हे अत्यंत हास्यास्पद आहे, असे खरगे म्हणाले. आज भाजप आणि संघ परिवारातील लोक गांधी कुटुंबाशी संबंधित संस्थांवर कब्जा करत असून या संस्था गांधी कुटुंबांच्या वैचारिक विरोधकांकडे सोपवत आहेत, असा आरोपही खरगे यांनी केला.

भाजप गांधीजींचा चष्मा चोरू शकेल, पण आदर्श नाहीत -खरगे

भाजप आणि संघ परिवारातील लोक गांधी कुटुंबाशी संबंधित संस्थांवर कब्जा करत असून या संस्था गांधी कुटुंबांच्या वैचारिक विरोधकांकडे सोपवत आहेत. वाराणसीतील सर्व सेवा संघही त्यांनी ताब्यात घेतला. गुजरात विद्यापीठात काय झाले ते सर्वांनाच माहीत आहे. ते गांधीजींचा चष्मा आणि काठी चोरू शकतात, परंतु ते गांधीजींच्या आदर्शांवर कधीच चालू शकणार नाहीत, असे, मल्लिकार्जुन खरगे भाजप आणि आरएसएसला उद्देशून म्हणाले. दरम्यान, मोदी सरकारने महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे संसद परिसरातून हटवून आणि त्यांना एका कोपऱयात बसवले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत बाबासाहेबांचा अवमान केला, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.